पोरीबाळींच्या मागे लागतो ? मुख्यमंत्री पदाच्या रांगेत कसा येणार; एकनाथ खडसेंची गिरीश महाजन यांच्यावर टिका

मुंबई – भाजपाने भारनियमनाविरोधात काढलेल्या जनआक्रोश मोर्चाच्या विरोधात टीका करताना “असा जनआक्रोश मोर्चा केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाईविरोधात का काढला जात नाही ? ही दुटप्पी भूमिका आहे”, असे खडसे म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तरादाखल “महागाईविरोधात आघाडी सरकारने आंदोलन करून पाहावे, किती लोक येतात ते त्यांना कळेल”, असा टोला गिरीश महाजन यांनी केला होता. दरम्यान, आमदार गिरीश महाजन यांच्या टोल्यावर एकनाथ खडसेंनी जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना प्रतिटोला लगावला आहे.

गिरीश महाजनांना मी सल्ला दिला होता की डिझेल, पेट्रोल, गॅसच्या वाढत्या किमतींबाबत मोर्चा काढला असता तर बरं झालं असतं. हे जिव्हारी लागण्याचं काही कारण नव्हतं. गिरीश महाजनांचे आंदोलन म्हणजे एक नौटंकी असते. कापसाला ७ हजार प्रतिक्विंटल भाव देऊ म्हणून त्यांनी एक नौटंकी केली होती. पण ते सरकारमध्ये मंत्री असतानाही हा भाव मिळाला नाही. फक्त नाटकं करायची ही त्यांची नेहमीची पद्धत आहे”, असे खडसे म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जाण्याची देखील योग्यता असावी लागते, असं म्हणत एकनाथ खडसेंनी टोला लगावला आहे. “मुख्यमंत्रीपदावरून माझ्यावर सातत्याने ते टीका करत असतात. पण मुख्यमंत्रीपदाची लायकी असायला हवी. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जाण्याचीही योग्यता असली पाहिजे. त्यासाठी मेहनत असली पाहिजे. सर्व पक्षांनी मान्यता देण्यासारखं नेतृत्व असलं पाहिजे. फक्त पोरीबाळींच्या मागे लागून कुणी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जात नाही.

नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्याच्या मेहनतीने गेला. जनतेच्या आशीर्वादाने गेला. मला अभिमान आहे की किमान उत्तर महाराष्ट्रात एका तरी व्यक्तीचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत गेलं. आत्तापर्यंत त्यांचं नावही कुठे येत नव्हतं. यांची नावं वेगवेगळ्या ठिकाणी जोडले जातात. अशा लोकांची मुख्यमंत्रीपदाबाबत बोलण्याची योग्यता तरी आहे का?” असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.

Share to