राजकारणाचा बट्ट्याबोळ, कोण कोणासोबत कट्टर ? 

महाईन्यूज ! प्रदीप लोखंडे

निष्ठावान, निष्ठा, कट्टरपणा, विचारधारा हे व याच्यासह अनेक शब्द राजकारणात आता मुळमुळीत,  गुळगुळीत आणि तकलादू झाले आहेत. कोण कोणत्या पक्षातून कधी निवडून येईल, कोण कोणासोबत कधी युती करेल, कोण सोबत कधी युती तोडेल याचा काहीच नेम सध्या राहिलेला नाही. पूर्वीही ही परिस्थिती होतीच. मात्र सध्या त्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे आपण नेमके कोणत्या पक्षाचे आहोत, हे छातीठोकपणे सांगणे हे कार्यकर्त्याच्या अवघड जागेचे दुखणे झाले आहे. ज्या पक्षाचा भोंगा कार्यकर्ते वाजवतात त्यांचे नेते मात्र इतर पक्षाचा झेंडा घेऊन कधी दुसरीकडे जाईल हे कळेनासे झाले आहे. त्यामुळे राजकारणाचा बट्ट्याबोळ, कोण कोणासोबत कट्टर ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

महाराष्ट्र राज्यात इतर राज्यांप्रमाणे प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे. अर्थात या राजकीय गोंधळाला भाजप विरोधकांमध्ये एकीचा अभाव असणे हे कारण आहेच. मात्र भाजपाने देखील मोठी भूमिका यामध्ये बजावली आहे. आपल्या विरोधकांना अडचणीत आणण्याची एकही संधी केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असणाऱ्या भाजपाने सोडली नाही. विविध प्रशासकीय यंत्रणांचा होणारा गैरवापर, राजकीय दबाव यासह जेवढा जास्त दबाव विरोधकांवर टाकता येईल तेवढे टाकण्याचे काम भाजपाच्या नेत्यांकडून सुरू आहे. राजकारणात काम करताना प्रत्येकाचे हात कुठे ना कुठे काळे झालेले असतेच. ते दाखविण्याचे काम केल्याने जेल मध्ये जाण्याची भीती नेत्यांना वाटत आहे. ही नामुष्कीच नको म्हणून अनेक नेतेमंडळी भाजपाच्या आश्रयाला जात असल्याचा आरोप काही नेते करत आहेत. त्यामुळे चुकीच्या कामाची होणारी चौकशी तरी टळत असल्याची भावना नेत्यांमध्ये आहे. 

याचाच एक भाग म्हणजे गेल्या वर्षी शिवसेनेत झालेली फूट होय. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निधीबाबत खूप अन्याय होत असल्याचे खडे शिवसेनेतील काही नेते फोडत होते.  त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले म्हणत 40 आमदार पक्षातून फुटले. भाजपासोबत जात राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होण्याची नामुष्की आली. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार हेच भाजपा आणि शिवसेनेच्या सध्याच्या राजकीय सत्तेत सहभागी होत याच शिवसेनेच्या नेत्यांच्या बोकांडी बसले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या नेत्यांना गप्प बसून बुक्क्यांचा मार सहन करावा लागणार आहे.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडून काही आमदार घेऊन भाजपा शिवसेनेसोबत आपला घरोबा केला. विकासासाठी भाजपाला साथ देणे गरजेचे असल्याचे त्यांच्याकडून व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून समर्थन केले जात आहे. तर नागालँड मध्ये भाजपाला समर्थन देणे, शिवसेनेसोबत जाणे याचे दाखले देत आपला निर्णय कसा योग्य आहे हे दाखविण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक करत आहेत. 

फुटलेला प्रत्येक जण आमचाच पक्ष खरा असल्याचे सांगत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मात्र आपण नेमक्या कोणत्या पक्षाचे आहोत हे सांगणे कठीण झाले आहे. कार्यकर्त्याने पक्षाकडे बघून दिलेल्या मताची किंमत नेतेमंडळी ठेवताना दिसत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या वेळी याचा जाब विचारण्याची हिंमत ठेवणे गरजेचे आहे.

——————————————–

प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज

मो. नं : 7350266967

Share to