तेजस ठाकरे यांची राजकारणात एंट्री, मुंबईत झळकले फ्लेक्स
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत. मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या शिवसेनेच्या पोस्टरवर उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंचे फोटो झळकल्याचे पाहायला मिळाले.
एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर देखील तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या बातम्या अनेकदा प्रसिद्ध झाल्या होत्या. आता दहीहंडीनिमित्त गिरगावमध्ये तेजस ठाकरे यांचे फ्लेक्स झळकल्याचे पाहायला मिळाले. ऐशेष म्हणजे या फ्लेक्सवर उद्धव ठाकरेंचा कुटुंबप्रमुख,आदित्य ठाकरेंचा युवा नेतृत्व तर तेजस ठाकरेंचा युवा शक्ती असा उल्लेख करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
तेजस ठाकरेंसाठी मोर्चेबांधणी
शिवसेनेमध्ये पडलेली फूट पाहता आदित्य ठाकरे राज्यभर मेळावे घेताहेत. उद्धव ठाकरे देखील लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अशात आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन तेजस ठाकरे यांच्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याच्या चर्च्या सध्या राजकीय वर्तुळात होत आहेत. तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करून शिवसेनेला उभारी देणार का ? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.