खरंय पवारांनी जे पेरलं ते उगवलं ; पण पवारांची पेरणीच दरवेळी नवीन असते !
महाईन्यूज ! प्रदीप लोखंडे
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी राजकारणात जे पेरले तेच उगवले अशी टीका सध्या पवारांवर होत आहे. ही टीका होण्याला कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच दस्तूरखुद्द काका शरद पवार यांच्या विरोधात केलेले बंड होय. पवारांवर ही टीका करणारे टीकाकार तत्कालीन मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांचे सरकार पवारांनी धोका देऊन पाडल्याचे उदाहरण देतात. यासह अनेक पक्षातील काका पुतण्यांमध्ये वाद निर्माण करून एकाला आपल्या पक्षात आणले. त्याचाच उलटा परिणाम म्हणून आज पवारांच्या वाट्याला देखील हे आल्याचे टीकाकार म्हणत आहेत. अजित पवारांच्या एका बंडामुळे शरद पवारांचे राजकीय अस्तित्वच जणू संपले अशा अविर्भावात टीकाकार बोलत आहेत. पवारांच्या राजकारणावर टीका करणे लोकशाहीत योग्यच आहे. मात्र ही टीका करताना पवारांची राजकीय ताकद प्रचंड मजबूत आहे हे विसरण्याची चूक विरोधक आणि टीकाकार करत आहेत. हे खरं आहे की पवारांनी जे पेरलं ते उगवलं ; पण पवारांची पेरणीच दरवेळी नवीन असते हे विसरून चालणार नाही. आज सोबत असणाऱ्या नेत्यांनी साथ सोडली असली तरी त्यांच्या जागी तेवढेच दमदार नेतृत्व उभे करण्याऐवढी ताकद पवारांनी निर्माण केली आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
जमिनीत एकच प्रकारचे पीक सातत्याने घेतले तर त्या जमिनीचा पोत ढासळतो. पिकांसाठी गुणात्मक दृष्टीने ती जमीन पोषक ठरत नाही. जमिन सुपीक ठेवायची असेल तर आलटून पालटून वेगवेगळी पीके घ्यावी लागतात हा शेतीबाबत निसर्ग नियम आहे. शेतीचा हा गुणधर्म केंद्रीय कृषिमंत्री म्हणून काम केलेल्या शरद पवारांना चांगलाच माहिती आहे. त्यामुळे हा गुणधर्म त्यांनी राजकारणातही जशाच तसा उतरविण्याचे काम केले आहे. पवारांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक तरुण नेतृत्वाची बियाणे रुजवली, जोपासली त्यांची वाढ केली आहे. ही वाढ करताना त्यांनी पर्यायी नेतृत्वाला देखील खतपाणी घालून जोपासले आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे एक जण सोडून गेला तर त्याच ठिकाणी तयार केलेल्या पर्यायी नेतृत्वाला पवार मैदानात उतरवितात. त्यामुळे पवार राजकीय डावपेचात कधीच अपयशी ठरलेले नाहीत हे वास्तव आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंत दादा पाटील यांचे सरकार शरद पवारांनी पाडले ही वस्तुस्थिती आहे. त्याच्या काही दिवसांनी सोबत असणारे 50 पेक्षा अधिक आमदार देखील पवारांची साथ सोडून गेले होते. त्यावेळी केवळ पाच आमदार पवारांच्या सोबत राहिले. वसंत दादांच्या बाबतीत शरद पवारांनी जे पेरले तेच उगवले असे त्यावेळी देखील म्हणायला वाव होता. मात्र पवारांनी महाराष्ट्र पालथा घातला. नवीन नेतृत्व उभी केली. आणि काही दिवसात पहिल्या पेक्षा जास्त आमदार निवडून आणून आपली ताकद सिद्ध करण्याचे काम पवारांनी केले आहे. सोडून गेलेले काही चार पाच आमदार वगळता इतर सर्व आमदारांना पाडण्याची राजकीय किमया पवारांनी केली होती हे विसरून चालणार नाही.
यासह अनेक उदाहरणे देता येतील. शरद पवारांनी कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी लढाई आपल्या बाजूने जिंकण्याचे कसब निर्माण केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे त्याचेच एक उदाहरण आहे. पवारांची काही राजकीय बलस्थाने आहेत. राज्यभरात त्यांच्या एवढा दांडगा लोकसंपर्क इतर कोणत्याच नेत्यांचा नाही. कोणत्या भागात गेल्यावर काय बोलावे, कोणाचे नाव काढावे याचा स्थानिक संदर्भ देऊन शरद पवार जनसामान्यांच्या मनाला साद घालतात आपलेसे करतात. त्यामुळे राज्यभरात त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाणवतो. पवारांवर टीका करणारेही शरद पवार ज्या वेळी मैदानात उतरतात त्यावेळी त्यांच्या बाजूने सकारात्मक बोलू लागतात हे त्यांचे राजकीय यश आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत एका पावसाच्या सभेवरून त्याची प्रचिती येते. या बरोबरच मित्र पक्षांसह विरोधकांसोबत शरद पवारांचे चांगले संबंध आहेत. अडचणीच्या काळात योग्य ते संबंध वापरून राजकीय डाव पलटविण्याचा मुत्सद्दीपणा पवार दाखवतात. या सर्वांपेक्षा महत्वाचा गुण म्हणजे कितीही अडचणी समोर उभ्या असल्या तरी शरद पवार डगमगत नाहीत, भावनिक होत नाहीत किंवा युध्द हरलो असे म्हणून मैदान सोडत नाहीत. ते अडचणीच्या काळात दहा हत्तीचे बळ घेऊन लढायला उतरतात. त्या बळावरच यशाला ते गवसणी घालतात.
आज 83 वय असताना त्यांच्या चोहोबाजूंनी राजकीय संकट आहे. घरातल्या पुतण्याने केलेल्या बंडाचे दुःख छाताडावर आहे. राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी हा योद्धा असेल त्या सैनिकांसह मैदानात पाय रोवून लढायला तयार झाला आहे. आणि म्हणत आहे…
उषकाल होता होता काळ रात्र झाली,
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.
शरद पवारांनी सुरेश भट यांच्या कवितेने कालच्या भाषणाचा केलेला समारोप विरोधकांनी हलक्यात घेऊ नये म्हणजे झाले.
——————————————-
– प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज
– मो. नं : 7350266967