पीएमआरडीएच्या कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई करा, माजी महापौरांची मागणी

  • महानगर आयुक्तांकडे केल्या तक्रारी

पिंपरी, दि. 10 – पिंपरी-चिंचवड आणि मुळशी तालुका कार्यक्षेत्रातील बांधकाम परवानगीचे कामकाज पाहणारे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) बांधकाम परवाना विभागातील कनिष्ठ अभियंता (एटीपी) विवेक डुब्बेवार यांच्याविरोधात तक्रारी वाढल्या आहेत. बाधकाम व्यवसायिक, भूधारक आणि शेतकरी यांना नाहक त्रास होत असल्याने डुब्बेवार यांच्या कार्यपध्दतीवर संशय निर्माण झाला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी महापौर, सामाजिक कार्यकर्ते, बांधकाम व्यवसायिक आणि शेतकऱ्यांनी केली आहे.

पीएमआरडीएच्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता (एटीपी) विवेक डुब्बेवार यांच्याकडे पिंपरी-चिंचवडसह मुळशी तालुका कार्यक्षेत्रातील बांधकाम परवाना फाईल तयार करण्याचे स्वाधिकार आहेत. बांधकाम व्यवसायिकांना परवाने घेण्यासाठी त्यांच्याकडे हेलपाटे मारावे लागतात. जाणिवपूर्वक बांधकाम परवाने आडवून ठेवत असल्याने बांधकाम व्यवसायिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्याबाबत वारंवार तक्रारी करुनही त्यांच्या कार्यपध्दतीत सुधारणा झालेली नाही. डुब्बेवार यांच्या विरोधात माजी महापौरांनी देखील महानगर आयुक्त राहूल महिवाल यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यावर महिवाल यांनी तंबी देऊन डुब्बेवार यांच्याकडून पिंपरी-चिंचवडमधील परवाना हस्तांतरण अधिकार शिथिल केले. त्यानंतर त्यांच्याकडे मुळशी भागातील बांधकाम व्यवसायिकांना परवाने देण्याचे अधिकार अबाधित राहिले आहेत. ही कारवाई करुनही डुब्बेवार यांच्या वागणुकीत बदल झालेला नाही. बांधकाम व्यवसायिक, भूधारक किंवा विकसक यांच्याकडून त्यांच्या आपेक्षा वाढत चालल्या आहेत.

मुळशी तालुका परिसरात गृहनिर्माण संस्थाना परवाने देण्यापोटी बांधकाम व्यवसायिकाने आर्थिक पुरवठा केल्याशिवाय काम होत नाही. उघडपणे आर्थिक मागणी केली जात आहे. तेवढे करुनही काही बांधकाम व्यवसायिकांच्या हातावर डुब्बेवार यांनी तुरी दिल्या आहेत. त्यामुळे या भागातील बांधकाम व्यवसायिक आता वैतागले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मागणीचे पत्र महानगर आयुक्त राहूल महिवाल यांना देऊनही कारवाई होत नसल्याची नाराजी बांधकाम व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. विकासकामांना आडथळे निर्माण करणारा कनिष्ठ अभियंता डुब्बेवार याला प्रशासनाकडून पाठिशी घातले जात आहे का? असा प्रश्‍न माजी महापौरांनी पत्रात उपस्थित केला आहे.


डुब्बेवार यांच्याबाबत लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यवसायिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौरांची ही तक्रार आली आहे. त्यांच्या अधिकारातील पिंपरी-चिंचवडचा भाग वगळण्यात आला आहे. यासंदर्भात प्रशासकीय बैठक घेण्यात येईल. बैठकीत डुब्बेवार यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

  • राहूल महिवाल, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

Share to