अनाथांची माय तसेच निस्वार्थी थोर समाजसेविकेला महाराष्ट्र मुकला
- माजी आमदार विलास लांडे यांनी स्व. सिंधुताईंना वाहिली श्रध्दांजली
पिंपरी (प्रतिनिधी) – राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुरूवारी (दि. 6) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी बोलताना भोसरी विधानसभा प्रथम आमदार व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, अनाथांची माय तसेच निस्वार्थी थोर समाजसेविकेला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची उंची मोजन्यापलीकडची आहे. सिंधुताईंची सामाजिक चळवळ वेगाने सुरू ठेवल्यास खरे सार्थक होईल.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील म्हणाले की, सिंधुताईंचे आदर्श विचार पुढे नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई यांचे जीवन अतिशय साधे होते. परंतु, मुलींना आईपेक्षाही जास्त प्रेम देऊन त्यांनी आधार दिला. त्यांच्या कार्याची माहिती जागतिक पातळीवर पोहोचली.
कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक व संस्थेचे विश्वस्त विक्रांत लांडे, विराज लांडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, व्ही. एस. पाटील, सर्व शाखांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्केत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.
