ओझर्डेत राष्ट्रवादीच्या दिनकर पाटलांपुढे स्व : पक्षीयांचे आव्हान
- सर्व गट एकत्र येत तगडा विरोध करणार
महाईन्युज ! प्रदीप लोखंडे
सांगली जिल्ह्यातील ओझर्डे गावात राष्ट्रवादी अंतर्गतच विरोधी गट तयार झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत गेल्या वेळचे सत्ताधारी असणाऱ्या दिनकर पाटील यांच्या पॅनेलपुढे इतर गटाने आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादीचेच बालाजी पाटील, अजित पाटील हे एकत्र पॅनेल निर्माण करून दिनकर पाटील यांना शह देतील, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचेच दोन गट एकत्र आल्याने दिनकर पाटील यांचा बालेकिल्ला मजबूत राहणार की त्याला भगदाड पाडले जाईल, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
ओझर्डे गावात ग्रामपंचायतीसाठी तीन वॉर्ड आहेत. प्रत्येक वार्डात तीन या प्रमाणे एकूण ९ ग्रामपंचायत सदस्य निवडून येतात. तर एक लोकनियुक्त सरपंच अशी १० जणांची ग्रामपंचायत कार्यकारिणी आहे. गावात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. मात्र पक्षातच अनेक गट निर्माण झाले आहेत. हे गट एकमेकांविरोधात निवडणुकीला सामोरे जात आहेत. सध्या गावात राष्ट्रवादीचे अजित पाटील, दिनकर पाटील, बालाजी पाटील यांचे गट आहेत. गावात गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिनकर पाटील यांच्या पॅनेलची सत्ता होती. तर दिनकर पाटील यांच्या पत्नी मंगल पाटील या लोकनियुक्त सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या. दिनकर पाटील यांच्या पॅनेलमधून सहा उमेदवार विजयी झाले होते. बालाजी पाटील व अजित पाटील यांच्या पॅनेलचे तीन उमेदवार विजयी झाले होते.
ओझर्डे गावातील यंदाची ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार आहे. सत्ताधारी दिनकर पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या गावातील इतर सर्व नेत्यांनी आघाडी केली असल्याची चर्चा आहे. बालाजी पाटील आणि अजित पाटील एकत्र पॅनेलची निर्मिती करून दिनकर पाटील यांच्यापुढे कडवे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. दिनकर पाटील हे मोठे उद्योजक आहेत. त्यांच्या अदिती उद्योग समूहाच्या इस्लामपूर मध्ये दोन तर नेर्ले येथे एक अशा तीन कंपन्या आहेत. एक गॅस एजन्सी आहे. ते स्वखर्चाने गावातील कामे करतात. त्यामुळे त्यांच्या मागे गाव उभे राहतो, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे बालाजी पाटील व अजित पाटील यांचा गावातील तरुणांशी मोठा संपर्क असल्याचे बोलले जाते. गावातील लोकांच्या अडचणीला मदत करणारे नेतृत्व म्हणून बालाजी पाटील यांची ख्याती आहे. गावात तीनही गट वेगवेगळे लढल्याने दिनकर पाटील यांना फायदा झाला आहे. मात्र आता त्यांच्या विरोधात बाकीच्या गटांनी युती केल्यास त्याचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीवर नाराजी ?
गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उद्योजक दिनकर पाटील यांच्या पत्नी मंगल पाटील यांना सरपंच म्हणून उमेदवारी दिली होती. त्या निवडूनही आल्या. सध्या गावात सरपंचपदासाठी खुल्या प्रवर्गातील पुरुष असे आरक्षण जाहीर झाले आहे. त्या जागी इतर उमेदवार उभे करायला पाहिजे असा गावातील सूर आहे. तसे करण्याऐवजी दिनकर पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील यांनाच उमेदवारी देण्याची चर्चा सुरु आहे. या विरोधात राष्ट्रवादीसह गावातील नागरिकांचा नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे सरपंच पदाच्या या उमेदवारी विरोधात विरोधी गट अधिक ताकद लावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज
- मो. नं – ७३५०२६६९६७