जयंतरावांच्या भाजपा प्रवेशाच्या वावड्या का उठतात ?

सांगली : प्रदीप लोखंडे

राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे खासदार शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतरही जयंत पाटील यांनी खासदार शरद पवार यांची अद्याप तरी साथ सोडली नाही. ते पक्षाची बाजू जोमाने मांडताना दिसत आहेत. मात्र तरीही ते भाजपाच्या गळाला लागतील आणि भाजपात प्रवेश करतील, अशा चर्चा रंगत आहेत. या चर्चांना खुद्द जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे नाकारले असले तरी या वावड्या का उठतात हा खरा प्रश्न आहे. तसेच या चर्चा करणारे आणि माध्यमांमध्ये बातम्यांची फूस लावून देणारे नेमके कोण आहेत, हे देखील अद्याप स्पष्ट होईनासे झाले आहे. 

सध्या राजकारणाचा चिखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोणाचा कोणावर विश्वास नसल्याचा राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. मांडीला मांडी लावून बसणारा सहकारी क्षणात दुसऱ्या पक्षात कधी उडी मारेल याची शाश्वती नाही. त्यामुळे कोण कुठल्याही पक्षात जाऊ शकतो, याचा ठाम विश्वास आता मतदारांना देखील झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बाबतीतही दोन वर्षांपासून भाजपा प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांनीही या चर्चांचे अनेक वेळा खंडन केले होते. मात्र राज्यसभेच्या खासदारकीच्या तोंडावर या चर्चा खऱ्या निघाल्याचे महाराष्ट्रासह देशाने पाहिले. राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील हे देखील भाजपवासी झाले. ज्या नेत्यांविषयी भाजपा प्रवेशाचे भाकीत केले जात होते, त्यापैकी बरेच नेते भाजपाच्या गोटात जाऊन बसल्याचे नंतर दिसले. आता याच चर्चा राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी देखील होताना दिसत आहेत. दोन ते तीन वेळा माध्यमांमधून या चर्चा पुढे आल्या आहेत. त्याला जयंत पाटील नकार देत असले तरी त्यांच्या भोवतीचे हे शंकेचे वादळ पूर्ण मिटवताना त्यांना अपयश येताना दिसत आहे. 

सध्या लोकसभेचे वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जयंतरावांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या नावाची चर्चा रंगत आहे. प्रतीक पाटील हे भाजपाचे उमेदवार असतील, अशा चर्चा वाळवा, शिराळा विधानसभा मतदारसंघात रंगत आहेत. सध्या महायुतीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा खासदार या मतदारसंघात असला तरी त्यांच्याविषयी असणाऱ्या नाराजीचा सूर पाहता आणि असलेली ताकद पाहता या मतदारसंघावर भाजपा दावा करण्याची शक्यता आहे. तसे झाले तर जयंतरावांना पक्षात घेण्याची वाट मोकळी करण्याच्या उद्देशाने प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्याचा डाव भाजपा आखु शकते. प्रतीक पाटील यांच्याविषयीच्या या चर्चा होत असताना त्या थांबविण्यासाठी जयंत पाटील गटातून देखील कोणीही सक्षमपणे पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे जयंतरावांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना हे एक निमित्त ठरत असावे.

राज्याच्या राजकारणात जयंत पाटील हे मोठे राजकीय नेतृत्व आहे. मात्र राष्ट्रवादीत फूट पडण्यापूर्वी त्यांचे नेतृत्व खुजे ठेवण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे झाल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीमध्ये जयंतरावांना विधानसभेचे विरोधी पक्षनेता हे पद योग्यता असूनही दिले गेले नाही. यावेळी देखील जयंतराव नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. सद्या खासदार शरद पवार यांच्या हातातून पक्ष, चिन्ह निसटून गेले आहे. नव्याने  संघर्ष करण्याचे आवाहन ते करत आहेत. मात्र भाजपासारख्या बलाढ्य राजकीय पक्षापुढे सद्या संघर्ष करण्याची वेळ नाही. हे ओळखून तसेच देश आणि राज्याचे राजकीय समीकरण पाहता जयंतराव भाजपात जाण्याचा अंदाज  बांधला जात असावा. 

सद्या तरी जयंत पाटील यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली नसली तरी भविष्यात काय होईल, हे आताच निश्चित सांगता येणार नाही. हे जरी असले तरी भाजपा प्रवेशाच्या या चर्चा सांगली जिल्ह्यातील जयंतरावांच्या विरोधकांना अस्वस्थ करणाऱ्या ठरत आहेत. ज्यांच्याशी राजकीय संघर्ष केला तेच भाजपात आले तर करायचे काय ? याची चिंता सध्याच्या भाजपाच्या नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे नेमक्या राजकीय भूमिका घेण्याची अडचण विरोधकांना होत आहे. आपल्या आमदारकीच्या स्वप्नांचे काय अशी चिंता भाजपाच्या नेत्यांना लागत आहे. कदाचित विरोधकांची ही घालमेल वाढावी म्हणूनच जयंतरावांच्या भाजपाच्या चर्चा रंगत असाव्यात अशा देखील राजकीय चर्चा आहेत. आगामी काळात नेमके काय होईल हे पाहणे मात्र उत्सुकतेचे ठरणार आहे.

————————————

प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज

मो. नं – 7350266967

Share to