ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रवादीत बिनविरोधच्या हालचाली
- माजी आमदार नाईक गटाशी जुळवून घ्या ; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचना ?
महाईन्युज ! प्रदीप लोखंडे
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक गावात राष्ट्रवादी अंतर्गतच वाद चव्हाट्यावर आले आहेत. पक्षातील दोन गटच एकमेकांविरोधात पॅनेल उभे करत आहेत. त्याचा पक्षाला फटका बसु शकतो. हे लक्षात घेता माजी आमदार शिवाजीराव नाईक गटाशी जुळवून घेऊन राष्ट्रवादी अंतर्गत निवडणुका न लावण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आपापसात असणारे वाद मिटवून समझोता करण्याच्या देखील सूचना पाटील यांनी दिल्या असल्याचे समजते. त्यामुळे वाळवा व शिराळा तालुक्यातील गावांमध्ये राष्ट्रवादीतील परस्पर विरोधी गट वाद मिटविण्यासाठी चर्चा करत असल्याचे चित्र आहे.
वाळवा आणि शिराळा तालुक्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तीन गटात विभागले गेले आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे गट तयार झाले आहेत. माजी आमदार शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीत दाखल झाल्याने सर्व गावात राष्ट्रवादीची ताकद आणखीन वाढली आहे. मात्र प्रत्येक नेत्याचे समर्थक आपापल्या गटाचे अस्तित्व राखण्याचे काम करताना दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये हे प्रकर्षाने जाणवताना दिसत आहे. प्रत्येक गावात माजी आमदार शिवाजीराव नाईक गटाविरोधात राष्ट्रवादीतील इतर असा सामना रंगत आहे. राष्ट्रवादीतील हा अंतर्गत वाद न मिटविल्यास पक्षात गटातटाचे राजकारण सुरु होईल. ही ‘रिस्क’ पक्षाकडून घेतली जाणार नाही.
हा वाद टाळण्यासाठी माजी आमदार शिवाजीराव नाईक गटाशी जुळवून घेण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे समजते. गटातटाचे राजकारण न करता पक्ष म्हणून एकत्र रहा. त्यासाठी हेवेदावे विसरून चर्चा करून ग्रामपंचायतमध्ये आपापले उमेदवार बिनविरोध द्या, अशा सूचना पक्षाकडून देण्यात आल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचना पदाधिकारी ऐकणार की गटाचे अस्तित्व टिकविण्यासाठी निवडणुकीला सामोरे जाणार हे आता पाहावे लागणार आहे.
तर अनेकांना लॉटरी लागणार –
राष्ट्रवादीकडून बिनविरोधसाठी प्रयत्न सुरु आहेत. हे शक्य झाले तर अनेक इच्छुकांना बिनविरोधची राजकीय लॉटरी लागणार आहे. विरोधकांना राग व्यक्त करण्यासाठी कोणतीच संधी मिळणार नाही. या बरोबरच खर्च होणाऱ्या पैशांची देखील बचत होणार आहे. हा फायदा पाहता सर्वच गट राष्ट्रवादीअंतर्गत वाद मिटविण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. तसेच बदलेल्या आरक्षणामुळे इतर वॉर्डात जाऊन नागरिकांना विनवणी करण्याची नामुष्कीच नको, यासाठी अनेक जण बिनविरोधचे प्रयत्न करत असल्याचे दिसते.
भाजपा बॅकफूटवर –
वाळवा आणि शिराळा तालुक्यातील प्रत्येक गावात सध्या राष्ट्रवादीचेच प्राबल्य दिसत आहे. सगळीकडे राष्ट्रवादीच्या पॅनेलचीच चर्चा आहे. पक्षातच गट एकमेकांविरोधात लढले तरी राष्ट्रवादीचीच सत्ता येणार आहे. मात्र दुसरीकडे भाजपाकडून विरोध करण्यासाठी सक्षम नेतृत्वच नसल्याचे दिसते. पक्षातील तालुक्याचे पदाधिकारीही गावागावातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिसत नाहीत. तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवल्याने दोन्ही तालुक्यात भाजपाचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेंत आहेत. त्यामुळे सध्या तरी भाजपा बॅकफुटवरच असल्याचे चित्र आहे.
- प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज
- मो नं – ७३५०२६६९६७