केंद्र सरकारकडून महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष कर्मचा-यांना राष्ट्रपती पदक जाहीर

मुंबई – प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारकडून पोलिस दलासाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पदक सन्मान जाहीर करण्यात आला आहे. पुणे पोलिस दलातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग वांजळे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय भोंग व दहशतवाद विरोधी पथकातील (एटीएस) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक काशिनाथ उभे चार जणांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. नानवीज येथील पोलिस प्रशक्षिण केंद्राचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी 26 जानेवारीच्या पुर्वसंध्येला पोलिस दलासाठीच्या राष्ट्रपती पदकांची घोषणा केली जाते. त्यानुसार, यंदाही राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे शहर पोलिस दलातील चौघांचा समावेश आहे. पांडुरंग लक्ष्मण वांजळे हे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकामध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. वांजळे यांना 250 बक्षिसे मिळाली आहेत. लष्कर भरती घोटाळा उघडकीस आणून अनेकांना अटक केली. पाकीस्तानच्या “आयएसआय’चा एजंट विशाल उपाध्याय यास झारखंड येथून अटक केली होती.

प्रकाश भिला चौधरी हे विशेष शाखेमध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम करतात. चौधरी यांना आत्तापर्यंत भोसरी, लष्कर, अलंकार, फरासखाना व गुन्हे शाखेत काम पाहीले आहे. जातीय दंगलीच्यावेळी कायदा-सुव्यवस्था राखणे, मानवी तस्करीच्या 11 गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यांना पोलिस महासंचालक सन्मानही प्राप्त झाला आहे. याबरोबरच त्यांना आत्तापर्यंत 239 बक्षिसे मिळाली आहेत. विजय उत्तम भोंग हे लष्कर पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर काम करतात. भोंग यांना 222 बक्षिसे मिळाली आहेत. त्यांना पोलिस महासंचालक सन्मानही प्राप्त झाला आहे. त्यांनी नक्षलग्रस्त भाग, वाहनचोरी, अवैध धंदे, मानवी तस्करी अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. शिवाजीनगर येथे पुणे दहशतवादविरोधी पथकामध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या काशिनाथ मारुती उभे यांनाही सन्मान प्राप्त झाला आहे. उभे यांना आत्तापर्यंत 234 बक्षिसे प्राप्त झाली आहेत. अंमली पदार्थ, अपहरण, खंडणी, खुन अशा गंभीर गुन्ह्यांची उकल त्यांनी केली आहे. पाकीस्तानच्या “आयएसआय’ एजंटची तीन प्रकरणे त्यांनी उघडकीस आणली होती.या चौघांनाही गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.

नानवीज येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस निरीक्षक चंद्रकांत रामभाऊ गुंडगे यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. गुंडगे यांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण पोलिस दल, खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे सेवा बजावली आहे. त्यांनी बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरीकांचा शोध घेऊन त्यांना परत पाठविणे, पोलिस शिपायांची गुणवत्ता उंचावणे, महामार्गावरील भेगा पडलेल्या पुलावरील वाहतुक थांबवून अपघात टाळणे अशी कामे केली आहेत. त्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झाले असून सव्वा तीन लाखांची बक्षिसेही प्राप्त झाली आहेत.

Share to