पोलीस भरतीच्या प्रक्रियेत सर्व्हर डाऊनचा ‘अडथळा’
- अर्ज भरण्यास होतोय विलंब ; सांगली जिल्ह्यातील युवकांची डोकेदुखी वाढली
महाईन्यूज ! प्रदीप लोखंडे
महाराष्ट्र शासनाच्या पोलीस सेवेत भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न अनेक युवकांनी पहिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती अखेर जाहीर झाली अन तरुणांना दिलासा मिळाला. हजारो युवक नेट कॅफेच्या दिशेने धाव घेत भरतीसाठी अर्ज करत आहेत. अर्ज करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने शासनाचे संकेतस्थळ वारंवार बंद पडत आहे. सर्वर डाउनच्या या समस्येने सांगली जिल्ह्यातील तरुण चिंतेत पडले आहेत.
पोलीस भरतीकडे लक्ष ठेऊन असणाऱ्या तरुणांची प्रतीक्षा संपली आहे. सध्या पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तरुणांनी भरतीसाठी सराव सुरु केला आहे. पहाटे गावागावातील प्रमुख रस्ते, शाळेच्या मैदानांवर मैदानी सराव करताना तरुण दिसत आहेत. तसेच दुसरीकडे अभ्यासालाही प्राधान्य दिले जात आहे. सध्या पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ९ नोव्हेंबर पासून सुरु आहे. अंतिम मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये असणाऱ्या नेट कॅफे अर्ज करण्यासाठी युवकांची गर्दी होत आहे. येणाऱ्या संख्येमुळे शासनाच्या संकेतस्थळावर लोड येत आहे. परिणामी संकेतस्थळ बंद पडत आहे. अर्ज भरला जात आहे. मात्र जमा करताना प्रक्रिया पूर्ण होत नाही. पुन्हा पहिल्यापासून अर्ज भरण्याची नामुष्की ओढावत आहे. तरुणांना तासनतास वाट पाहावी लागत आहे. तर अनेकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. त्यामुळे तरुणांसाठी हे डोकेदुखीचे ठरत आहे.
परीक्षेचे असे स्वरूप असणार –
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 किलोमीटर धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
अधिक जागेमुळे मुंबईला प्राधान्य
मुंबई पोलीस शिपाईची ७ हजार ७६ पदे रिक्त आहेत. तर चालक पोलीस शिपाई पदाची ९९४ पदे रिक्त आहेत. इतर ठिकाणी कमी संख्या असल्याने अनेक तरुण मुंबईसाठी अर्ज करायला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे त्याठिकाणी अधिकची स्पर्धा निर्माण होऊन मेरिट देखील जास्त लागत आहे. त्या ठिकाणी अर्ज करणारे तरुण अधिकचा सराव करत आहेत.
–प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज
–मो. नं – ७३५०२६६९६७