पावसात साचणाऱ्या पाण्यापासून हाऊसिंग बोर्डमधील सोसायटीधारकांची मुक्तता
- माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने एच टाईप मधील पाईपलाईन बदलली
पुणे |प्रतिनिधी
येरवडा येथील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मधील एच टाईप सोसायटीधारकांना पावसाच्या साचणाऱ्या पाण्यापासून मुक्तता मिळणार आहे. नागरिकांनी पुणे महापालिका प्रशासनाकडे पाईपलाईन बदलण्याबाबत वारंवार तक्रार केली होती. मात्र कोणी दखल घेतली नाही. अखेर माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर डॉ. धेंडे यांच्या सूचनेने प्रशासनाने त्वरित हालचाली केल्या. ड्रेनेजची पाईपलाईन बदलून घेण्यात आली. त्यामुळे पाण्याचा निचरा होऊन सोसायटी परिसरात पाणी साचणार नाही. सोसायटीधारकांचा रखडलेला प्रश्न सोडविल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

दरवर्षी होणाऱ्या मुसळधार पावसातील साचणाऱ्या पाण्याचा पुणे शहरासह प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. ड्रेनेजच्या पाईपलाईन अनेक वर्षे न बदलल्याने त्या जीर्ण झालेल्या आहेत. परिणामी पावसाळ्यात कचरा अडकून व इतर कारणांनी पावसाचे पाणी साचून राहत आहे. येरवडा येथील प्रभाग दोन मधील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डच्या सोसायटीधारकांना गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात एच टाईप सोसायटीचा परिसर पूर्ण जलमय होत असे. पाणी साचल्याने तळमजल्यावरील असणाऱ्या घरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. तसेच साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार पसरतील अशी भीती नागरिकांमध्ये होती. या ठिकाणची पाईपलाईन बदलण्याबाबत नागरिकांकडून वारंवार पाठपुरावा केला जात होता. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात होते.
त्यानंतर नागरिकांनी प्रभागातील लोकप्रतिनिधी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची भेट घेऊन आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. धेंडे यांनी या समस्येची दखल घेऊन महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. महापालिका कर्मचाऱ्यांनी त्वरित पाईपलाईन बदलण्याच्या कामाला सुरुवात केली. पूर्वी असणारी छोटी पाईपलाईन बदलून आता त्या ठिकाणी मोठी पाईपलाईन बसविण्यात आली आहे. आमच्या प्रश्नाची दखल घेऊन काम पूर्ण करून दिल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त करत डॉ. धेंडे यांचे आभार मानले.
गेली 5 ते 6 वर्ष पावसाळ्यात आम्हाला अडचणींना सामोरे जावे लागत होते. परिसरात पाणी झाल्याने आमची वाहने देखील पाण्यात जात होती. आम्हाला इतर ठिकाणी वाहने लावावी लागत होती. आम्ही डॉ. धेंडे यांना सांगितल्यानंतर त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सूचना करून पाईपलाईन बदलून घेतली. त्यामुळे आता आम्हाला काम झाल्याचा आनंद आहे.
- आदिल पटेल, रहिवाशी, एच बिल्डिंग, महाराष्ट्र हाउसिंग सोसायटी. येरवडा
गेल्या काही दिवसांपासुन एच टाईप मधील नागरिक माझ्याकडे समस्या घेऊन येत होते. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचत होते. त्या बाबत महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मकता दर्शवित कामाला सुरुवात केली आहे. लवकरच नागरिकांची होणाऱ्या त्रासातून सुटका होईल.
- डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे मनपा.