बार्टी समोर संशोधक विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
- २०१८ च्या संशोधक विद्यार्थ्यांना एमफिल ते पीएचडीसाठी ५ वर्ष फेलोशीप देण्याची मागणी
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थाबाहेर संशोधक विद्यार्थांनी आंदोलन छेडले आहे. बार्टीच्या २०१८ च्या संशोधक विद्यार्थ्यांना एमफिल ते पीएचडीसाठी ५ वर्ष फेलोशीप द्यावी, अशी मागणी संशोधक विद्यार्थांनी केली आहे. तसेच पीएचडीच्या संशोधक विद्यार्थ्यांची फेलोशिपची मर्यादा ३ वर्षांवरून वाढवून ती ५ वर्षे करावी, अशी मागणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
अक्षय जाधव, नारायण खरात, भीमराव वाघमारे, श्रद्धा शिरसाट, दीक्षा ढगे, आदी ठिय्या आंदोलनाला बसले आहेत.
राज्यभरात अनेक विद्यार्थी विविध विषयात संशोधक म्हणून अभ्यास करत आहेत. अनेकांनी परिस्थिती बेताची आहे. अशा संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी मार्फत दिली जाणारी फेलोशीप आधार बनत आहे. मात्र फेलोशिप मिळण्याची मर्यादा वाढविणे गरजेची आहे. ती न वाढविल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बार्टीच्या २०१८ च्या संशोधक विद्यार्थ्यांना एमफिलची तीन तर पीएचडीसाठी २ अशी एकूण ५ वर्ष फेलोशीप द्यावी, अशी मागणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्यात येणार आहे. या वेळी कोणता अनुचित प्रकार घडल्यास आम्ही जबाबदार नसल्याचे विद्यार्थांनी नमूद केले.