भाजपला दणका : शहराध्यक्ष आमदार पक्षाला सोडचिट्टी देणार !

  • चुकीच्या कामांचा पश्चाताप झाल्याने भूमिकेत बदल
  • भाजपच्या विद्यमान नगरसेवकाने केला गौप्यस्फोट

पिंपरी | विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक जवळ येईल तसे भाजपाच्या गोठात जोरदार फटाके फुटू लागले आहेत. शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी मनमानी व हुकूमशाही पध्दतीने महापालिकेत हस्तक्षेप करत नगरसेवकांना त्रास दिला आहे. त्यांच्या चुकीच्या कामांवर पडदा टाकण्यासाठी पक्षाच्या प्रामाणिक नगरसेवक व कार्यकर्त्याला बदनाम केले जात आहे. उद्या वेळ आलीच तर दोन्ही हुकूमशाह आमदार भाजपाच्या पाठित खंजीर खूपसून राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षात प्रवेश करतील. परंतू, पक्षाशी एकनिष्ठ असणारा सामान्य कार्यकर्ता पक्षासोबत कदापी गद्दारी करणार नाही, अशी तक्रार नगरसेवक तुषार कामठे यांनी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

प्रति,

मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस साहेब

मा. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते

विषय : भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत न्याय व संधी देणेबाबत…

उपरोक्त विषयान्वये मी तुषार कामठे (नगरसेवक पिं. चिं. मनपा) आपणास विनंती करू इच्छितो कि येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवण्याचा आपल्या सर्वांचाच मानस आहे. पण गेल्या ५ वर्षांमध्ये शहरातील भाजपचे दोन आमदार श्री. महेश लांडगे व श्री. लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या अनेक चुकीच्या कामांमुळे येत्या निवडणुकांमध्ये भाजपाला याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

या आमदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे खापर विरोधी पक्ष व जनता महापालिकेतील आपल्या नगरसेवकांवर फोडणार हे निश्चित. लांडगे व जगताप यांनी शहरात मनमानी व हुकूमशाही पद्धतीने महापालिकेत हस्तक्षेप करत अनेक नगरसेवकांना त्रस्त केले आहे. त्यामुळे आपल्याच पक्षातील काही नगसेवक यांच्या कारभारावर नाराज आहेत. तरी आपण येत्या महापालिका निवडणुक तिकीटवाटपाच्या संदर्भात लांडगे गट किंवा जगताप गटाचा समर्थक, नातेवाईक किंवा स्नेही म्हणून निर्णय न घेता भाजपच्या मेहनती सर्वसामान्य सच्च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी अशी आपणास विनंती.

राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांकडून मी भाजपच्या आमदारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजप पक्ष सोडणार असल्याची चर्चा सध्या शहरात चालू  आहे. पण मी भाजपच्या कोणत्याही आमदाराच्या गटातील म्हणून नव्हे तर भाजपचा एक सच्चा शिलेदार म्हणून काम करतो आहे. ज्या दोन आमदारांनी चुकीची कामे केली आहेत ते कदाचित स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पक्षाचा त्याग करू शकतात, तशी शक्यताही सध्या वर्तवली जात आहे. पण मी भाजपच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकारण करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाशी एकनिष्ठ राहणार असून पक्षाचे होणारे नुकसान पाहू शकत नाही. हे दोन्ही आमदार वेळ प्रसंगी पक्ष बदलतील परंतु नवीन कार्यकर्ता केव्हा ही पक्ष बदलू शकत नाही

तरी माझ्या विनंतीचा सकारात्मक विचार करून आपण निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.

धन्यवाद..!

आपला नम्र

तुषार कामठे

(नगरसेवक, पिं. चिं. मनपा)

Share to