शरद पवारांच्या एण्ट्रीने भाजपा आमदारांची पाचावर धारण
- राष्ट्रवादीशी छुपा समझोता, कारवाईची भीती ?
- शहराध्यक्ष लांडगेंची तलवार म्यान
पिंपरी | विशेष प्रतिनिधी
भाजपच्या दोन्ही आमदारांनी पिंपरी-चिंचवडची दोन भागात वाटणी केली आहे. ही वाटणी कशासाठी केली याचा खोलात जाऊन विचार करण्याची गरज असल्याचे सूचक विधान राज्यातील महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी केले. ही टिका दोन्ही आमदारांवरती झाली असली तरी त्याअगोदर ती भाजपाच्या प्रतिमेवर झालेली आहे. त्यामुळे विरोधक म्हणून पवारांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देणे शहराध्यक्ष या नात्याने आमदार महेश लांडगे यांची जबाबदारी आहे. परंतु, पॉलिटिक्स विथ रिस्पेक्टच्या नावाखाली प्रतिक्रिया देणे त्यांनी टाळले आहे. ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’च्या नावाखाली शहराध्यक्ष लांडगे यांनी भाजपाचा डिसरिस्पेक्ट (अवमान) केला आहे. अशा भूमिकेमुळे शहर भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. कारवाईच्या भीतीपोटी लांडगे यांनी आपली तलवार म्यान केली असल्याची जोरदार चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी दोन दिवस पिंपरी-चिंचवड मध्ये तळ ठोकला. महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीची माहिती ही त्यांनी घेतली. भाजपचा कारभार संशयास्पद वाटल्याने त्यांनी आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर नाव न घेता टीका केली. शहराची दोन भागात वाटणी कशासाठी करण्यात आली. यामागे दोन्ही आमदारांचा हेतू काय हे लक्षात घेतले पाहिजे, असे सुचक विधान त्यांनी केले. यामध्ये काही तरी तथ्य आहे म्हणूनच पवारांनी जाहीरपणे हे विधान केले. यावर विरोधी पक्षाच्या शहाराध्यक्षाकडून प्रतिक्रिया येणे अपेक्षीत होते. परंतु, ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’च्या नावाखाली माघार घेण्यात आली. वास्तविक पाहता आपला कारभार चव्हाट्यावर आला तर उगाच कारवाईचा ससेमिरा मागे नको, या भीतीपोटी आमदार लांडगे यांनी यावर प्रतिक्रिया देने टाळले असावे. अथवा आगामी काळात राजकीय डावपेचात भाजपला उतरती कळा लागली तर राष्ट्रवादीचे दरवाजे आपल्यासाठी उघडे असावेत म्हणून लांडगे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार देऊन ‘पॉलिटिक्स विथ रेस्पेक्ट’चे ढोंग केले असावे, असे बोलले जात आहे. पण असे वागत असताना शहराध्यक्ष लांडगे यांच्याकडून भाजपचा डीसरिस्पेक्ट (अवमान) झाला आहे. त्यांच्या दुटप्पी वागण्यामुळे भोसरीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने भाजपचे सर्वच पदाधिकारी धास्तावले आहेत. भीतीचे सावट कायम असल्यामुळे भोसरीचे बहुतांश नगरसेवक महापालिकेत फिरकत सुद्धा नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यातील 30 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती चर्चेत आहेच. याचा अर्थ आता शहाराध्यक्षांचे पक्षावरील नियंत्रण सैल होत चालले आहे. कधी काळी ‘दादा बोले तैसा चाले’ अशी कार्यकर्त्यांची भूमिका असायची. परंतु, आता ते वातावरण राहिले नाही. जो तो विकासकामांचा हिशोब विचारू लागला आहे. 420 कोटींचे रस्ते कुठे गेले, ऑनफिल्डचा डंका पिटणा-यांनी आंध्र-भामा असखेडचे पाणी कुठपर्यंत आले ते सांगावे, व्हीजन 20-20 च्या आश्वासित कामांचे काय झाले. या प्रश्नांची उत्तरे नसल्यामुळे लांडगे यांची मोठी पंचाईत झाली आहे. आणि त्यांच्या एकहूकमी कारभारामुळे नगरसेवक, कार्यकर्ते प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. याचा अर्थ भाजपला भोसरीतूनच खिंडार पडण्याचे संकेत मिळत आहेत. त्याची सुरुवात चऱ्होलीतून होणार असून सर्वसामान्य नागरिकांच्या पोटावर पाय देऊन बिल्डर लॉबीला बळ दिल्याचा वचपा काढला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
नागरिकांमधून व्यक्त होणारी नाराजी आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे शहाराध्यक्षांनी तोंडाला कुलूप लावले असावे. शरद पवार शहरात येऊन भाजपवर टीका करतात त्यावेळी शहराध्यक्ष या नात्याने त्यांच्या टिकेल प्रतिउत्तर देने आमदार लांडगेची जबाबदारी मानली जाते. परंतु, त्यांनी पवारसाहेब मोठे नेते असल्यामुळे टीका करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी माघार घेतली आहे. यामुळे भाजपचा मोठा अवमान झाला आहे. त्यामुळे उलट लांडगे यांनाच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पटलांची बोलणी खावी लागण्याची शक्यता आहे.