महापौरांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपूजन

पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील विविध विकासकामे शहरवासियांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे योग्य नियोजन करून त्यांचे आज भूमिपूजन करण्यात आले असून आगामी काळात नागरिकांच्या दृष्टीने ते अत्यंत उपयोगी ठरेल, असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी विकासकामांचा भूमिपूजन समारंभ महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रभाग क्र. ३० मधील कासारवाडी येथील स्मशानभूमी आणि दफनभूमी तसेच नाशिकफाटाउड्डाणपुलावरील बी आर टी एस बसथांब्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी महापौर योगेश बहल,नगरसदस्य राजू बनसोडे,रोहित उर्फ आप्पा काटे,  श्याम लांडे नगरसदस्या आशा धायगुडे- शेंडगे, स्वाती उर्फ माई काटे, स्वीकृत नगरसदस्य माऊली थोरात,जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक सामाजिक कार्यकर्ते  दत्तोबा लांडगे, देवदत्त लांडे, प्रकाश जवळकर, संजय शेंडगे, अनिल बारणे, डॉ. महेश शेटे, मौलाना युसुफ, मौलाना मेहबूब नागू, अब्दुल लतीफ सय्यद, अब्दुल रशीद सय्यद,  उपस्थित होते.

प्रभाग क्र. ३० मधील कासारवाडी येथे नविन अद्ययावत स्मशानभूमी बांधण्यात येणार असून स्मशानभूमीमध्ये २ आकर्षक प्रवेशद्वार, २ दीपस्तंभ, ३ अग्निकुंड तसेच बसण्यासाठी ओटा तयार करण्यात येणार आहे.  या कामासाठी सुमारे ३ कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.तसेच कासारवाडी येथील मुस्लिम दफनभूमी मध्ये सुधारणाविषयक कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यामध्ये प्रवेशद्वार, प्रार्थना हॉल, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय, वजुखाना तसेच दफनभूमीत आकर्षक गार्डन, सुरक्षा केबिन, वॉचमनक्वॉटर चे काम करण्यात येणार आहे.या कामासाठी सुमारे ५ कोटी ९८ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्याच बरोबर नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावर बीआरटीएस बस स्टेशन बांधण्यात  येणार असून. या ठिकाणी ५ मीटर रुंद ३० मीटर लांब लोखंडी पादचारी मार्ग आणि जीना बांधण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे २ कोटी ४६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

तसेच प्रभाग क्र. १३ आणि १५ मध्ये निगडी येथील जय ट्रेडर्स समोर  पादचारी भुयारी मार्ग उभारण्याच्या कामाचे भूमीपूजन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, मनसे गटनेते सचिन चिखले, कमल घोलप, सुमन पवळे, शैलजा मोरे, शर्मिला बाबर, उपस्थित होते. पादचारी भुयारी मार्ग बांधल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यास मदत होणार आहे, पर्यायाने अपघाताचा धोका कमी होणार आहे. महत्वाचे म्हणजे याठिकाणी अंध आणि दिव्यांग नागरिकांना व्हीलचेअरवर बसून जाण्यासाठी रॅम्पची सुविधा देखील करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे ४ कोटी ७ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास करण्यास महापालिका कटिबद्ध आहे असे महपौर माई ढोरे  यावेळी म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Share to