निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडून विकासकामांच्या भूमीपूजनाचा धडाका

पिंपरी (प्रतिनिधी) – आज लोकार्पण झालेल्या तसेच भूमिपूजन झालेल्या विकासकामांमधून भविष्यात शहरवासीयांना उत्तम सोयी उपलब्ध होतील असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रभागातील विकास कामांचे उद्घाटन,भूमिपूजन तसेच लोकार्पण महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन सोहळ्याची सुरुवात प्रभाग क्र. ३२ सांगवी येथील विरंगुळा केंद्राच्या उद्घाटनाने झाली. यावेळी नगरसदस्य संतोष कांबळे, हर्षल ढोरे, नगरसदस्या शारदा सोनवणे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच सांगवी येथील ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. दोन एकर परिसरामध्ये दोन हजार चौ.फुटाचे विरंगुळा केंद्र बांधण्यात येणार असून याकामासाठी सुमारे र.रु. ७० लाख इतका खर्च येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे यांनी दिली.

चिंचवड येथील आरक्षण क्र. २२१ मधील क्रिडांगण व जिजाऊ उद्यान जॉगिंग ट्रॅकचे उद्घाटन व मोरया गोसावी हॉस्पिटल ते यशोपूरम पुलापर्यंतचा रस्ता विकसित करण्याच्या कामाचे भूमिपूजन महापौर माई ढोरे हस्ते पार पडले. यावेळी ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य राजेंद्र गावडे, नगरसदस्या अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे-पाटील, मनिषा पवार, स्वीकृत सदस्य अॅड.मोरेश्वर शेडगे उपस्थित होते. बहुउद्देशीय क्रिडांगणाचा विस्तार अडीच एकर जागेमध्ये असून त्यामध्ये २८५ मी. लांब व ३ मी. रुंदीचा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आलेला असून या मैदानामध्ये खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल इ. खेळांचा सोयी उपलब्ध असणार आहेत. यासाठी र.रु. ७३ कः ४९ हजार इतका खर्च आला आहे. प्रभाग क्र. १८ मधील राजमाता जिजाऊ पर्यटन केंद्रामध्ये जिजाऊ सृष्टीमध्ये योगासन, व्यायाम प्रतिकृती उभारणे व उद्यानाचे नूतनीकरण कामे करणे आदींचा समावेश असणार आहे. मोरया गोसावी हॉस्पिटल ते यशोपूरम पुलापर्यंत अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्याच्या कामासाठी र.रु. ११ कोटी ९५ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. यामध्ये आधुनिक पार्किंगव्यवस्था, सायकल ट्रॅक, जागेच्या आवश्यकतेनुसार रोड फर्निचर तसेच प्रत्येक १० मी. अंतरावर सुशोभित दिवाबत्या लावण्यात येणार आहेत.

कासारवाडी येथील मंत्री कॉम्प्लेक्स शेजारील मोकळ्या जागेवर बांधण्यात आलेल्या तीन मजली बहुउद्देशीय हॉलचे लोकार्पण महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसदस्य योगेश बहल, शाम लांडे तसेच नागरिक उपस्थित होते. सदर जागेचे क्षेत्रफळ २४० चौ.मी. असून बांधकाम क्षेत्र १८९.८० चौ.मी. आहे.

पुणे नाशिक महामार्गावरील लांडेवाडी येथील कमानीचे तसेच भोसरी येथील संत ज्ञानेश्वर भाजी मंडई व व्यापारी संकुलाचे उद्घाटन तर भोसरी सहल केंद्र येथील फिश अॅक्वेरीयमच्या कामाचे भूमीपूजन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, नगरसदस्य संतोष लोंढे, नगरसदस्या भिमा फुगे, सोनाली गव्हाणे, आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजा लांडगे, माजी नगरसदस्या शुभांगी लोंढे तसेच भोसरी येथील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

लांडेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कमानीची उंची २७ मी. असून रुंदी १८ मी. इतकी आहे. सदर कामासाठी घडीव दगडांचा वापर करण्यात आला असून या कमानीसाठी र.रु. २ कोटी ९९ लाख इतका खर्च आलेला आहे. संत ज्ञानेश्वर भाजी मंडईमध्ये ८ फुटx५ फुट आकाराचे १८८ भाजी विक्री गाळे असून १२ फुट x १० फुट आकाराची ९१ दुकाने आहेत. यासाठी सुमारे र.रु. १२ कोटी इतका खर्च आला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता देवण्णा गट्टूवार यांनी दिली.

अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणा-या फिश अॅक्वेरीयममध्ये १० मी. उंचीचा शार्क माश्याचा पुतळा उभारण्यात येणार असून वॉक थ्रू टनेल मधून नागरिकांना मासे पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. तसेच यामध्ये फिश गॅलेरी, स्नो वर्ल्ड, कॅफेटेरीया, सेल्फी पॉइंट इ. चा समवेश असणार आहे. या प्रकल्पासाठी र.रु. ५ कोटी २ लाख इतका खर्च अपेक्षित आहे.

प्रभाग क्र. ३ वडमुखवाडी येथील जलतरण तलाव आणि च-होली येथील वाघेश्वर महाराज उद्यान व क्रिडा संकुलाचे लोकार्पण आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, नगरसदस्य नितीन काळजे, संतोष लोंढे नगरसदस्या सुवर्णा बुर्डे, विनया तापकीर आदी उपस्थित होते. वाघेश्वर महाराज उद्यानामध्ये अॅम्पी थिएटर, जॉगिंग ट्रॅक, सुसज्ज पार्किंग व्यवस्था, स्त्री-पुरुष स्वतंत्र स्वच्छतागृह आदींचा समावेश आहे. वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेला जलतरण तलाव २५ मी. लांब, १६ मी. रुंद व २.१ मी. खोली असून संपूर्ण तलाव आच्छादित आहे. याकामासाठी र.रु. ६ कोटी ४७ लाख इतका खर्च आलेला असून यामुळे चऱ्होली व आजूबाजूच्या भागातील नागरिकांना याचा वापर करण्यात येणार आहे.

च-होली येथील स्मशानभूमीमधील विविध सुधारित कामांचे लोकार्पण महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसदस्य नितीन काळजे, संतोष लोंढे नगरसदस्या सुवर्णा बुर्डे, विनया तापकीर उपस्थित होते. स्मशानभूमीत एकूण ४ दहनशेड नव्याने तयार करण्यात आल्या असून लोकांना बसण्यासाठी वेटिंग शेड, दशक्रिया विधींसाठी बैठक व्यवस्था, दिपस्तंभ, फ्लॉवरबेड, नेवासा पद्धतीचे फ्लोरिंग पार्किंग व्यवस्था व दर्शनी भागात विविध म्यूरल्स बसविण्यात आले आहेत. याकामांसाठी र.रु. ८ कोटी १० लाख इतका खर्च करण्यात आलेला आहे.

बुर्डेवस्ती येथील २० दशलक्ष लिटर क्षमतेच्या तसेच प्राईड सिटी येथील ७० दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या उभारण्याच्या कामाचा शुभारंभ देखील महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमा॑चे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Share to