दिव्यांग व एचआयव्ही, एड्स बाधित बस पासधारकांना अर्ज करण्याचे पालिकेचे आवाहन

पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील दिव्यांग नागरिक व एचआयव्ही, एड्स बाधित नागरिकांना मोफत बस पाससाठी नव्याने अर्ज करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे करण्यात आले आहे.

अर्ज वाटप व स्विकृतीसाठी 1 ते 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी पिंपरीतील कै. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन येथून अर्ज घेऊन विहीत कागदपत्र सोबत जोडून तो जमा करावा. याच ठिकाणी अर्ज वाटप व स्विकृती सकाळी अकरा ते सायंकाळी चार या वेळेत सुरू राहील.

जुन्या पासधारकांकडील मी-कार्ड बंद झाले आहेत. त्यामुळे दिव्यांग व एचआयव्ही, एड्स बाधित पासधारकांनी आपले पासपोर्ट साईज दोन फोटो, मुळ मी-कार्ड, आधारकार्ड झेरॉक्स प्रत, दिव्यांग प्रमाणपत्र आदी कागदपत्र घेऊन यावे. नागरिकांनी दिलेल्या मुदतीत अर्ज जमा करावेत, असे आवाहन नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे करण्यात आले आहे.

Share to