संभाजी ब्रिगेडच्या वतीने एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

पिंपरी (प्रतिनिधी) – संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने चिंचवड येथील माणिक कॉलनी येथे रविवारी दोन सत्रात घेण्यात आलेले प्रशिक्षण शिबीर उत्साहात पार पडले. शिबिराचे उद्घाटन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक रमेश हांडे यांच्या हस्ते झाले.

शिबिराचा विषय हा बुध्द ते शिवराय, अ ब्राह्मणी परंपरेच्या इतिहासाची ओळख असा होता. या विषयावर पुरोगामी विचारांचे लेखक वक्ते नितीन सावंत सरांनी कार्यकर्त्यांना दिवसभर मार्गदर्शन करत बुद्ध परंपरा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत इतिहासाची मांडणी मुद्देसूदपणे केली यामध्ये बुद्धकालीन समाजव्यवस्था तसेच समकालीन देवी देवतांविषयी मत मतांतरे याची मुद्देसूद मांडणी केली तसेच संत नामदेव महाराज ते संत तुकाराम महाराज व त्यांच्या कार्याची सखोल मांडणी केली हे कार्य करताना सर्वांनाच मनुवादी व्यवस्थेचा जो त्रास झाला त्यांची विस्तृत मांडणी प्राध्यापक नितीन सावंत सरांनी आपल्या मार्गदर्शनातून पुढे आणली तसेच संघटना वाढीसाठी कार्यक्रम व ध्येय धोरण काय असावे यावर सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पी जी तांबारे, संभाजी ब्रिगेड शहर कार्याध्यक्ष ज्ञानदेव लोभे, संजय जाधव, संघटक सुभाष जाधव, मावळ तालुका अध्यक्ष आदिनाथ मालपोटे, रेड स्वस्तिक सोसायटीचे राज्याचे उपमहासंचालक अशोक शिंदे, शाहुराज कदेरे, नकुल भोईर गणेश कुंजीर, गणेश दाभाडे हे उपस्थित होते. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे शहर सचिव मंगेश चव्हाण, उपाध्यक्ष नितीन जाधव, संघटक रविंद्र चव्हाण, पराग जाधव, सिद्धार्थ भोसले, वशिष्ठ आवटे यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाची प्रस्तावना पुणे जिल्हा उपाध्यक्ष विशाल जरे यांनी केली आभार पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते यांनी मानले या शिबिराचे आयोजन संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतिश काळे यांनी केले होते.

Share to