रहाटणीत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न
- माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन आयोजित कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
पिंपरी (प्रतिनिधी)- येथील सनशाईन नगर सोसायटीमध्ये संभाजी महाराज ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संकल्पनेतून आणि माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या सहकार्यातून ‘जागतिक महिला दिन 2022’ निमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि ‘महिलांचे प्रबोधन व सक्षमीकरण’ या प्रबोधनात्मक विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उदघाटन पुणे आयकर विभागाच्या उपायुक्त क्रांती खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कायदेविषयक सल्लागार तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ऍड. मनीषा महाजन या होत्या. यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. दिपाली धाइंजे, केंद्रीय युवा व खेल मंत्रालयाच्या निवृत्त उपसंचालक पौर्णिमा काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी अखिल भारतीय राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा प्रारंभिक परिक्षेत संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावीत रहाटणी गावचा गौरव वाढविणाऱ्या कु. गौतमी संजय निकम या विद्यार्थीनीचाही आयोजकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ प्रबोधनकार शारदा मुंढे यांचा क्रांतीज्योती मी सावित्री बोलते हा एकपात्री सादर करण्यात आला. यावेळी प्रभाग क्रमांक 33 मधील शेकडो माता भगिनींनी उत्स्फूर्त हजेरी लावली होती.