शिवछत्रपती कुस्ती संकुलातील पैलवान विश्रांती पाटील ठरली रौप्यपदकाची मानकरी
पुणे – हरियाणा येथे मार्च १४ ते १७ दरम्यान पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील शिवछत्रपती कुस्ती संकुलातील पैलवान विश्रांती पाटील ही रौप्यपदकाची मानकरी ठरली आहे.
मांजरी खुर्द शिवछत्रपती कुस्ती संकुलात सराव करणारी व कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेणारी पैलवान विश्रांती पाटील हिने 55 किलो वजन गटात रौप्यपदक मिळवले आहे. विश्रांती ही मूळची कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार लोकसंख्या असलेल्या आकाशी
ह्या छोट्याश्या गावातील परंतु कुस्तीचे स्वप्न उराशी बाळगून गेले पाच ते सहा वर्षे पुण्यातील शिवछत्रपती कुस्ती संकुल मांजरी खुर्द येथे संकुलाचे अध्यक्ष प्रकाशशेठ सावंत, त्यांचे बंधू वस्ताद पैलवान सतीश सावंत, वस्ताद विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली सराव करीत आहे.
विश्रांती सोबत चर्चा केली असता तिने असे सांगितले की तिच्या व वस्ताद असे दोघांच्या कष्टाच्या व चिकाटी च्या जोरावर तिला हे यश मिळाले तसेच तिने हे ही सांगितले की आंतरराष्ट्रीय पैलवान दिशा कारंडे, तसेच प्रतीक्षा सुतार, प्रतीक्षा बागडी, स्मिता पाटील, कीर्ती गुंडलेकर, समृद्धी खांदवे अश्या अनेक राष्ट्रीय महिला खेळाडू व होतकरू खेळाडू येथे सराव करत आहेत.
तसेच हृषिकेश सावंत, आदर्श पाटील, समर्थ माखवे असे अनेक राष्ट्रीय खेळाडू सराव करत आहेत. तसेच भविष्यात ऑलिंपिक स्पर्धांमध्ये खेळण्याचे स्वप्न असल्याचे तिने सांगितले. विश्रांती च्या ह्या यशाचे कौतुक संकुलाचे अध्यक्ष प्रकाश शेठ सावंत यांनी केले तसेच मांजरी व आकाशी परिसरात विश्रांतीचे कौतुक होत आहे.