शिवजयंतीनिमित्त पिंपरी ते निगडी मनसे कार्यकर्त्यांच्या दुचाकी रॅलीचा झंजावात

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जंयती निमित्त पिंपरीतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून ते निगडी भक्ती-शक्ती समुह शिल्पापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून जयघोष करण्यात आला.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी-चिंचवडतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहर मनसेच्या पिंपरीतील मध्यवर्ती कार्यालयापासून ते निगडीतील छत्रपती शिवाजी महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या समुहशिल्पापर्यंत मनसैनिकांनी दुचाकी रॅली काढली.

निगडीतील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सर्वांनी अभिवादन करून जयघोष केला. यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील मनसेचे असंख्य कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन चिखले, रुपेश पटेकर, सीमा बेलापूरकर, बाळा दानवले, राजू भालेराव, हेमंत डांगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share to