संतांचा वारसा आणि विचाराद्वारे आपण जगाला एका विचारधारेत गुंफू शकतो – प्रा. डॉ. सदानंद मोरे
पिंपरी (प्रतिनिधी) – जागतिकीकरणाच्या युगात आता आपण जगाचे नागरिक झालो आहोत. मात्र आजही जगात एक विचार स्विकारण्यात आलेला नसल्याने पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्याची ताकद संतांच्या विचारसरणीत आहे. वैश्विक कुटुंबाची संकल्पना रुजवण्यासाठी आपल्याकडे संतांचा वारसा आणि विचार आहेत. त्याआधारे आपण जगाला एका विचारधारेत गुंफू शकतो, असे प्रतिपादन राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित टाळगाव चिखली येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे संचालक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, टाळगांव चिखली यांच्या वतीने संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त “जगद्गुरू संत तुकाराम महाराज जीवन दर्शन” या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा डॉ मोरे बोलत होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, टाळगांव चिखली येथे आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासक व आयुक्त तथा जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमास संतपीठाचे संचालक राजु महाराज ढोरे, अभय टिळक, स्वाती मुळे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी उपस्थित होते.
परिसंवादामध्ये संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प.संतोष महाराज बढेकर, हभप अभय जगताप, हभप आप्पा बागल, अमृता कोल्हे, सचिन पवार यांनी सहभाग घेतला होता. प्रारंभी गायत्री थोरबोले यांनी ‘तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम’ हा अभंग सादर केला. यानंतर नेहा नाफडे यांनी ‘पैल आले हरी’ हा अभंग सादर केला. बाल विद्यार्थिनी लावण्या विजय कमजाळे हिने इंग्रजी भाषेतून संत तुकाराम महाराज यांची महती सांगितली.
‘ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी म्हणती साधू’ हा अभंग सादर करून तिने रसिकांची वाहवा मिळवली.
संतपीठाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर गतीने वाटचाल सुरू आहे याबद्दल समाधान व्यक्त करून प्रशासक राजेश पाटील म्हणाले, आधुनिक युगामध्ये संत परंपरेतील मूल्य समाजापर्यंत रुजवण्याची गरज आहे. या अमूल्य ठेव्याचा देशाबाहेर प्रचार प्रसार करण्यासाठी अभ्यासक तयार करणे गरजेचे असून ते संतपीठाच्या माध्यमातून निर्माण होतील. अध्यात्मावर काम करणाऱ्या व्यक्तींचे पुनर्स्मरण संतपीठाच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये सर्वांचा आंतरिक सहभाग आणि पाठिंब्याचे बळ मिळेल अशी अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. भारतामध्ये संतांविषयी संशोधन अथवा अभ्यास करण्यासाठी भविष्यात संतपीठ हे प्रभावी माध्यम ठरणार असून त्यादृष्टीने जडणघडण सुरू आहे. संतपीठातून संत विचारांचा प्रचार प्रसार करणारे सैनिक तयार होतील, असेही ते यावेळी म्हणाले.
संतपीठाची संकल्पना मूर्त स्वरूपात पाहत असताना अतिशय आनंद होत आहे, अशी भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, मनापासून जबाबदारी स्वीकारून संतपीठाचे संचालक मंडळ काम करत आहे. संतपीठामध्ये राजकीय हस्तक्षेप असू नये अशी माझी आग्रही भूमिका राहिली आहे. संतपीठाचे काम वाढत आहे याबद्दल त्यांनी महापालिका प्रशासनाचे कौतुक केले. संतपीठ हे भक्तीचे आणि अध्यात्माचे महत्वपूर्ण स्थान असून याद्वारे जगात संत विचारांचा प्रचार-प्रसार होणार आहे. त्यामुळे टाळगाव चिखलीचे नाव देखील जागतिक पातळीवर जाणार आहे. भोसरीतील कुस्ती संकुलामध्ये शक्तीची उपासना होते. या संकुलाच्या माध्यमातून शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत अशी इच्छा असून त्यादृष्टीने महापालिकेने प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही आमदार लांडगे यांनी यावेळी व्यक्त केली.
हभप संतोष महाराज बढेकर म्हणाले, संत तुकोबारायांचे विचार आणि आचार लौकिकदृष्ट्या नव्हे तर त्यांचे कार्य अलौकिक होते. तुकोबारायांनी गाथेच्या माध्यमातून शब्दांची रत्ने समाजाला दिली. त्यांचे आचार विचार आणि नीती तत्वांचे जीवन प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. अभिमान सोडून सर्वसामान्य आयुष्य जगत असताना ते आनंदाने जगावे अशी शिकवण तुकाराम महाराज यांनी दिली.
हभप अभय जगताप म्हणाले, संतांचे जीवन दर्शन घडवण्यासाठी शालेय शिक्षणासारखा योग्य मार्ग आहे. संत कायम लोकशिक्षकाच्या भूमिकेत असतात. तुकोबारायांचे जीवन बोध घेण्यासारखे आहे. संत विचार नेमके काय आहे, भक्तीचा व्यवहार कसा अपेक्षित आहे, यासाठी संत तुकाराम महाराज यांचे जीवनदर्शन अभ्यासणे गरजेचे आहे. त्याकाळी पडलेल्या दुष्काळ काळात तुकोबांनी घरातील धान्य लोकांना वाटले. कर्ज आणि गहाण खते त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. लोकांविषयी कळवळा तुकोबारायांमध्ये होता. प्रयत्नवाद शिकवणारे, आत्मविश्वास निर्माण करणारे आणि दुर्दम्य आशावादी असणारे संत तुकाराम महाराज होते. त्यांचे जीवन सर्वांनी अभ्यासले पाहिजे. संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी शालेय स्तरावर संत विचारांचे शिक्षण संतपीठाच्या माध्यमातून दिले जाणार आहे ही कौतुकास्पद बाब आहे, असे जगताप म्हणाले.
संत तुकाराम महाराज कृतिशील संत होते असे आप्पा बागल यांनी सांगितले. अमृता कोल्हे म्हणाल्या, परंपरा आणि आधुनिकता या परस्पर विरोधी गोष्टी आहेत आणि अध्यात्म हा उतारवयात करण्याचा उद्योग आहे असे गैरसमज काही लोकांमध्ये आहेत. परंतु संत विचारांची परंपरा ही आधुनिक आहे. संतांचे विचार आधुनिक आहेत. संतांनी सांगितलेले विचार संसारिक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी आहेत. आपले