1 लाख 11 हजार 111 वेळा ‘जाणता राजा’ लिहून साकारली शिवाजी महाराजांची आश्वरुढ रांगोळी
पुणे (प्रतिनिधी) – शिवजयंतीनिमित्त मोडी लिपीमध्ये एक लाख 11 हजार 111 वेळा ‘जाणता राजा’ लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वरूढ रांगोळी साकारण्यात आली आहे. श्रुती गणेश गावडे यांनी ही शक्कल लढविली असून तो प्रत्यक्षात साकारला आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासाची गुपितं ज्या मोडी लिपीमध्ये दडली आहेत, जी भाषा शिवरायांच्या पराक्रमाचा वारसा अन स्वराज्याच्या रोमहर्षक इतिहासाचे वर्णन सांगते, ती मोडी लिपी, आपली भाषा कालपरत्वे अडगळीते की काय असे वाटत होते. मात्र, श्रुती गावडे यांनी अथक परिश्रम करून या उपक्रमाद्वारे मोडी लिपी साक्षात प्रकट केली आहे.
श्रुती गावडे या मोडी लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी अभिनव आणि कलात्मक उपक्रम राबवत असतात. अनेक स्तुत्य उपक्रम राबविल्यानंतर यंदा मोडी लिपीच्या माध्यमातून शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यासाठी श्रुती यांनी कोथरुडमध्ये नॉर्थ डहाणूकर कॉलनी, तेजस नगर येथे शिवाजी महाराजांची 1200 चौरस फुटी रांगोळी मोडी लिपीमध्ये लिहून साकारली आहे.
तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा वेळा जाणता राजा या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. शिवरायांना मानवंदना देण्यासाठी व ही रांगोळी बघण्यासाठी अनेक नागरिक डहाणूकर कॉलनी येथे भेट देत आहेत. या उपक्रमाचे आयोजन हर्षाली दिनेश माथवड यांनी केले.