पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमात सायबर सुरक्षा अध्यापनाचा समावेश

पुणे – काळाची गरज ओळखून देशातील विद्यापीठे व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये येत्या शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा अभ्यासक्रम विषय शिकवला जाणार आहे.

यासंदर्भातील परिपत्रक आणि या अभ्यासक्रमाचा मसुदा विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे खूप गुंतागुंतीचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षेचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा अभ्यासक्रमाची निर्मिती “यूजीसी’कडून करण्यात आली आहे. पदवीपूर्व स्तरावर सायबर सुरक्षेची मूलभूत तत्त्वे आणि मध्यम पातळीवरील अभ्यासक्रम असेल. तर पदव्युत्तर पदवी स्तरावर मध्यम आणि प्रगत पातळीवरच्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. दोन्ही स्तरावरील अभ्यासक्रमात प्रात्यक्षिके आणि व्याख्याने यांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमासाठी चार क्रेटिड दिले जाणार आहेत.
या घटकांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश

सायबर क्षेत्र, सायबर गुन्हे, सायबर गुन्ह्यांचा महिला आणि मुलांना असलेला धोका, सायबर गुन्ह्यांचे स्वरुप, समाजमाध्यमांवरील गोपनीयता, इंटरनेट बॅंकिंग, डिजिटल पेमेंट, मोबाइल पेमेंट, आधार, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट सुरक्षा, मोबाइल फोन सुरक्षा, उपकरणे सुरक्षा, वाय-फाय सुरक्षा, अँटी व्हायरस, सायबर हल्ला, सायबर दहशतवाद, सायबर युद्ध, ऑनलाइन जॉब फ्रॉड, ब्लॉकचेन, सायबर गुन्हे आणि शिक्षा अशा घटकांचा सायबर सुरक्षा अभ्यासक्रमात समावेश असणार आहे.

Share to