उद्यापासून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई, नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास भरावी लागणार दंडाची ही रक्कम

पिंपरी (प्रतिनिधी) – पार्किंग पॉलिसी राबविण्यासाठी तसेच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईसाठी पोलीस यंत्रणा टोईंग व्हॅनसह सज्ज झाली आहे. शुक्रवार (दि. 25) पासून पिंपरी-चिंचवड शहरात जोरात कारवाई होणार आहे. नो पार्किंगमध्ये दुचाकी उभी केल्यास वाहनमालकाकडून जीएसटीसह तब्बल 736 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख रस्त्यांवर पार्किंग पॉलिसी राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार ठिकाणी ‘पे अँड पार्क’ देखील सुरू करण्यात आले आहेत. मात्र बेशिस्त वाहन चालकांमुळे पे अँड पार्क योजनेचा फज्जा उडाला होता.

पोलिसांकडून बेशिस्त वाहनांवर अशी अपेक्षा महापालिकेची होती. मात्र कारवाईसाठी टोइंग व्हॅन आपल्याकडे नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेने वाहतूक पोलिसांना टोइंग व्हॅन उपलब्ध करून दिल्या आहेत. या टोइंग व्हॅनद्वारे शुक्रवार (दि. 25) पासून कारवाईला सुरुवात होणार आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास भरावा लागेल असा दंड 

नो-पार्किंग दंड – 500 रुपये

टोईंग चार्जेस – 200 रुपये,

जीएसटी – 36 रुपये

एकूण – 736 रुपये

Share to