मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक हळूहळू पुर्ववत, केमिकलचा टॅंकर पलटी झाल्याने झाली कोंडी

पिंपरी (प्रतिनिधी) – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर केमिकलचा टॅंकर पलटी झाल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाखाली आज सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

पलटी झालेल्या टॅंकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्यावर सांडल्याने मुंबई लेनमधील वाहतूक थांबवण्यात आली. पर्यायी मार्ग म्हणून सर्व वाहतूक लोणावळ्यातून वळविण्यात आली. लोणावळ्यात देखील प्रचंड वाहतूककोंडी झाली. दरम्यान, ऑईल सांडलेल्या भागात माती व बारिक खडी टाकत केमिकल बाजुला सारण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले.

मुंबई लेनची एक बाजु वाहतुकीसाठी सुरु ठेवण्यात आली. धिम्म्या गतीने वाहने जाण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, लोणावळा शहरातील कोंडी देखील कमी झाली असून वाहने सुरु आहेत. खंडाळा भागात अद्याप कोंडी कायम आहे. दुपारनंतर वाहतूक पुर्वपदावर येईल अशी माहिती महामार्ग व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

आयआरबी पेट्रोलिंग व देखभाल दुरुस्ती विभाग, खंडाळा व बोरघाट महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आदींनी सकाळपासून घटनास्थळी मदतकार्य राबविले. अपघातग्रस्त टँकर व कंटेनर बाजुला करत वाहतूक सुरु करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले.

सकाळी कामानिमित्त तसेच शनिवार, रविवारच्या सुट्टीनिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे, प्रवाशांचे व वाहनचालकांचे मोठे हाल झाले. जुन्या हायवेवरील वाहतूक सुरु झाली असली तरी द्रुतगती मार्गावर आडकलेली जड वाहने अद्याप देखील एकाच जागेवर उभी आहेत.

Share to