खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसद विशिष्ट रत्न’ पुरस्कार प्रदान
पिंपरी (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसदीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरीनिमित्त ‘संसद विशिष्ट रत्न पुरस्काराने’ आज (शनिवारी) दिल्लीत गौरविण्यात आले. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुशीलकुमार चंद्रा यांच्या हस्ते हा पुरस्कार खासदार बारणे यांना प्रदान करण्यात आला.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, माजी मंत्री विराप्पा मोईली, हंसराज अहिर, प्राईम पॉईंट फाऊंडेशनचे संस्थापक के. श्रीनिवास, अध्यक्षा प्रियादर्शनी राहुल आदी उपस्थित होते.
संसदेतील उत्कृष्ट कामगिरीनिमित्त चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्या वतीने संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. लोकसभेत महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग संसदेमधील उपस्थिती तसेच स्थानिक खासदार विकास निधीचा संपूर्ण वापर या अष्टपैलू कामगिरीबद्दल शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना मागील सलग सात वर्षांपासून गौरविण्यात येत आहे. पाच वर्षे ‘संसदरत्न’, एकदा महासंसदरत्न आणि सातव्यावर्षी ‘संसद विशिष्ट रत्न पुरस्कार’ देऊन खासदार बारणे यांना गौरविण्यात आले.