मृत व्यक्तींच्या नावावर लाखो रुपयांची कामे घेणा-या ठेकेदार संस्थेला काळ्या यादीत टाका

  • ‘एमआयएम’चे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांची मागणी

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भांडार विभागात एका मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावावरील ‘फर्म’ला लाखो रुपयाचे टेंडर दिले आहे. सदरील फर्म बेकायदेशीररित्या चालविली जात असून त्या संस्थेला अधिका-यांचे पाठबळ मिळत असून मृत व्यक्तींच्या नावावर फर्म चालवून लाखो रुपयांची कामे मिळविली जात आहेत. त्यामुळे भांडार विभागात आंधळं दळतं अन्ं कुत्रं पीठ खातंय अशी स्थिती निर्माण झालीय. दरम्यान, भांडार विभागात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावावरील फर्मला लाखो रुपयाची टेंडर देणा-या अधिका-यांचे निलंबन करावे आणि  संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकून संस्था चालविणा-यावर फाैजदारी कारवाई करावी, अशी मागणी एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी केली आहे.

महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागातून विविध विभागाच्या मागणीनुसार खरेदी व पुरवठा करण्यात येतो. महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागातील काही अधिका-यांना हाताशी धरून ठेकेदार आर्थिक संगणमताने टेंडर प्रक्रियेत सहभागी होत आहेत. त्यात एका मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावे असलेल्या फर्मला गेल्या सहा ते आठ महिन्यापासून लाखो रुपयांची टेंडर मिळवून देण्यात आलेली आहेत.

भांडार विभागात रेखा इंजिनिअरींग या फर्मचे प्रोप्रायटर यांचे काही महिन्यापूर्वी मृत्यू झालेला आहे. त्यांच्याच नावे जीएसटी रजिस्टेशन आणि पॅन कार्ड उपलब्ध आहे. मात्र, भांडार विभागाने कायदा विभागाच्या घेतलेल्या अभिप्रायवर रेखा इंजिनिअरींग या फर्मवर बाबर नामक व्यक्तीने कोट्यावधी रुपयांची टेंडर मिळवून घेतली आहेत. सदरील बाबर यांनी मृत व्यक्तीबरोबर पावर ऑफ अटर्जी (Power of Attorney) घेतल्याचे दाखवित संयुक्त उपक्रम (Joint venture) करून रेखा इंजिनिअरींग फर्मवर टेंडर प्रक्रियेत कामे घेत आहेत.

सदरील रेखा इंजिनिअरींग फर्म बाबर हे बेकायदेशीर चालवित आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तीशी संयुक्त उपक्रम (Joint venture) असल्याचे दाखवून स्वताचे पॅन कार्ड फर्मशी जोडले आहे. कायदा विभागाच्या अभिप्राय घेवून केवळ भांडार विभागात कामाचा अनुभव आणि टर्नवर दाखविण्यासाठी मधूकर बाबर यांनी सदरील फर्म बेकायदेशीर चालवून लाखो रुपयाच्या कामाचे टेंडर मिळविली आहेत.

या प्रकरणी रेखा इंजिनिअरिंग संस्थेची तात्काळ चौकशी करून काळ्या यादीत टाकण्यात यावे, तर मृत्यू झालेल्या व्यक्ती नावे फर्म चालवून काम करणा-या बाबर यांच्यावर कायदेशीर फाैजदारी कारवाई करण्यात यावी, यापुढे रेखा इंजिनिअरिंग फर्मवरील कामाचा अनुभव व टर्नवर कोणत्याही टेंडर प्रक्रियेत ग्राह्य धरण्यात येवू नये. तसेच संबंधित संस्थेच्या बेकायदेशीर कामाला पाठिशी घालून लाखो रुपयाची टेंडर मिळवून देणा-या अधिका यांचे निलंबन करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावे. अशी मागणी साळवे यांनी केली आहे.

Share to