पूर्णवेळ अधिकारी असताना शिक्षण विभागासाठी आता अर्धवेळ अधिका-याची मागणी
- पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाची राज्य शासनाकडे हास्यास्पद मागणी
- प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांच्याकडे दिली माध्यमिक विभागाची जबाबदारी
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासनाच्या मागे कायमच शुक्लकाष्ट लागले आहे. अर्धवेळ अधिका-यांच्या हातून या विभागाचा कारभार आता कुठे शासननियुक्त पूर्णवेळ अधिका-याच्या हाती गेला आहे. तरीही पालिका प्रशासन याविभागासाठी अर्धवेळ अधिका-याची नियुक्ती करण्याचा अट्टाहास धरत आहेत. शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांच्याकडील प्राथमिकचा चार्ज काढून त्यांच्याकडे माध्यमिक विभागाचे अधिकार देण्याची घिसाडघाई पालिका प्रशासनाने लावली आहे. त्यांना माध्यमिक विभागात बसवून प्राथमिक विभागात पूर्व प्रभारी प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांची अर्धवेळ नियुक्ती करण्याची मागणी प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे.
कोविड 19 संसर्ग संक्रमण रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार तब्बल दोन वर्षे प्राधमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. कोविड प्रतिबंधक उपाययोजनानंतर कोरोनाची लाट ओसरली. त्यानंतर जानेवारीमध्ये राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु, दोन वर्षे घरात बसून ऑफलाईन धडे गिरविलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गुणवत्ता न तपासताच त्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा मार्ग शाळा प्रशासनाला नाईलाजास्तव अवलंबावा लागला. केवळ औपचारिकता म्हणून परीक्षा घेण्याचा सोपस्कार केला जात आहे. शाळा आणि शिक्षणाची अशी वाट लागलेली असतानाच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाला दरम्यान पूर्णवेळ प्रशासन अधिकारी मिळाला नाही. पूर्व प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांची पूर्णवेळ नियुक्ती नसल्यामुळे त्यांना म्हणावा तेवढा वेळ देता नाही. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रशासनातील कर्मचा-यांचा मनमानी कारभार सुरू झाला. यामध्ये प्राथमिक शिक्षण क्षेत्राचा पुरता बोजवारा उडाला.
शिक्षण विभागाचा कारभार उरकत नसल्याने पूर्व प्रभारी शिक्षण अधिकारी गौड यांनी बदली करून घेतली. त्यानंतर शिक्षण विभागाचे कामकाज पूर्णवेळ सांभाळण्यासाठी राज्य शासनाने संजय नाईकडे यांची प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती केली. परंतु, त्यांना नियुक्त करून घेण्याबाबत पालिका प्रशासनाने सुरूवातीला उदासिनता दाखवली. मात्र, राज्य शासनाने खडसावल्यानंतर नाईकडे यांना नियुक्त करून घेतले. त्यांनी या विभागाचा कारभार स्वीकारून एक महिना देखील झाला नाही. तरी त्यांना माध्यमिक विभागाचा चार्ज देण्यात आला आहे. मुळात नाईकडे यांची नियुक्तीच शासनाकडून झालेली आहे. त्यांना मनपा स्तरावर माध्यमिकची जबाबदारी देण्यामागे प्रशासनाची चुकीची भूमिका असल्याचे दिसते.
कोविड काळानंतर शिक्षण क्षेत्र सुधारण्यासाठी प्रथमिक विभागात पूर्णवेळ अधिका-याची गरज आहे. परंतु, त्यांना माध्यमिक विभागात पाठवून प्राथमिक विभागासाठी पूर्व प्रभारी प्रशासन अधिकारी गौड यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी मनपा प्रशासनाने राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडे केल्याची माहिती समजते. पालिका प्रशासनाच्या अशा गलथान कारभारामुळे मनपा शाळेतील शिक्षणाचे तीनतेरा वाजल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा पहायला मिळत आहे.