हसन मुश्रीफ व त्यांच्या परिवाराने 158 कोटींचा घोटाळा केला, आता ठाकरे सरकारची उलटी गिणती सुरू झाली – किरीट सोमय्या

पिंपरी (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ व त्यांच्या मुलाने आणि जावायाने सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या विरोधात भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयाने याचिका दाखल केली आहे. बंद पडलेल्या कंपनीतून पैशांचे मनी लॉन्ड्रींग केले आहे. त्यांच्या विरोधातील पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील याचिकेवर सुनावणी झाली असून यासंबंधात एफआरआय दाखल होईल. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराने जो 158 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्याच्यावर कारवाई होणार आहे, असा दावा भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

निगडीतील आरओसी कार्यालयात ग्रामविकास मंत्री हनस मुश्रीफ यांच्या कंपनीसंदर्भातील माहिती घेण्यासाठी सोमैय्या आले होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, प्रदेश सचिव अमित गोरखे, मुख्य संघटक अमोल थोरात, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक उत्तम केंदळे आदी उपस्थित होते.

सोमय्या म्हणाले की, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराने 158 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, त्यांच्या मुलाने कंपनी नोंदणी करताना फसवणूक केल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. मंत्री अनिल परब यांनी बेकायदेशीर रिसॉर्ट बांधला असून त्याप्रकरणी दापोली न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. आता ठाकरे सरकारच्या घोटाळे बाजाची उलटी गिनती सुरु झाल्याचा हल्लाबोल भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला.

शिवसेना गृहमंत्र्यांच्या कामावर नाराज असल्याची नौटंकी केली जात असून ठाकरे आणि पवार हा मुद्दा विचलीत करत असल्याचा आरोप करत सोमैय्या म्हणाले, अजित पवार यांनी 1200 कोटी रुपयांचा जरंडेश्वर कारखाना ढापला त्याचे शरद पवार यांनी पहिले उत्तर द्यावे. उद्धव ठाकरे यांचे सीईओ अनिल परब यांच्यावर फौजदारी कारवाई सुरु झाली. त्याचे उत्तर उद्धव ठाकरे यांना देता येत नाही. ठाकरे सरकारने पोलिसांचा माफियागिरीसाठी उपयोग केला आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्या पत्नींची जालना साखर कारखान्यात गुंतवणूक आहे. त्यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या व्यवहाराची चौकशी सुरु असून योग्यवेळेला योग्य कारवाई होणार आहे. तो कारखाना ईडीने जप्त केला आहे, असेही ते म्हणाले.

Share to