पिंपळगाव बाजार समिती निवडणूक मतमोजणी दरम्यान तुफान राडा, दोन्ही गट भिडले…
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
महाईन्यूज : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी लोकमान्य परिवर्तन पॅनलचे नेते आणि ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम आणि अपक्ष उमेदवार यतीन कदम मतमोजणी केंद्रावर आमने सामने येताच तुफान राडा झाला. यावेळी उपस्थित पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत गर्दीला बाजूला केले.
आज नाशिक बाजार समितीसह सात बाजार समिती निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. अनेक बाजार समिती निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. अशातच महत्वाची समजली जाणारी पिंपळगाव बाजार समिती निवडणुकीत फेर मतमोजणीच्या मुद्द्यावरून अपक्ष उमेदवार यतीन कदम आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. माजी आमदार अनिल कदम यांचे स्वीय सहायक नितीन निकम यांच्यावर यतीन कदम धावून गेल्याने हमरीतुमरीवर गोष्ट आली. त्यामुळे मतमोजणी केंद्रात काही काळ गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. बंदोबस्तावरील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान आतापर्यंत पिंपळगाव बसवंत बाजार समिती निवडणुकीत दिलीप बनकर, अनिल कदम, गोकुल गिते, निवृत्ती शिरसाठ, दिपक बोरस्ते, रामभाऊ माळोदे, डॉ. प्रल्हाद डेर्ले, खालकर मनीषा, अमृता पवार, यतीन कदम, नंदु गांगुर्डे हे उमेदवार विजयी झाले आहेत. आर्थिक दुर्बल गटात राजेश पाटील, शरद काळे आणि राजेश पाटील विजयी.तर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. यात हमाल मापारी गटातून शेतकरी विकास पॅनलचे रविंद्र दौलत पवार हे 75 मते मिळवून विजयी झाले आहेत. तर व्यापारी गटातून लोकमान्य परीवर्तन पॅनलचे सचिन अग्रवाल हे 170 आणि शेतकरी विकास पॅनलचे सुशील पलोड 158 मतांनी विजयी झाले आहेत.
दरम्यान पिंपळगाव बाजार समिती निवडणुकीत काल मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज सकाळपासून मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. यासाठी दहा टेबलावर मतमोजणी सुरु आहे. पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 98 टक्के मतदान झाले. पिंपळगाव बाजार समितीच्या 10 केंद्रांवर मतदान झाले. सहकारी संस्था गटात 98 तर ग्रामपंचायत गटात शंभर टक्के मतदान झाले. सहकारी संस्था गटात 930 पैकी 925 जणांनी मतदान केले. ग्रामपंचायत गटात 651 मतदारांनी, व्यापारी गटात 661 जणांनी तर हमाल तोलारी गटात 370 जणांनी मतदान केले. जवळपास 2667 मतदारांपैकी पैकी 2603 जणांनी मतदान केले.