पिंपरी चिंचवडमध्ये गुंडाचा हैदौस सुरूच, 8 ते 9 वाहनांची तोडफोड

पिंपरी – पिंपरी चिंचवडमधील निगडी (Nigadi) परिसरात आठ ते नऊ वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निगडी परिसरातील वाहतूक नगर येथे ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 11 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास निगडी परिसरात अज्ञातांनी वाहनांची तोडफोड केली. आरोपींच्या हातात कोयते, लाकडी दांडके होते आणि त्याचा धाक दाखवत त्यांनी वाहनांची तोडफोड केली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

आरोपींनी कोयता, लाकडी दांडक्याने टेम्पो, ट्रकच्या काचा फोडल्या. या घटनेत अंदाजे 50000 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. आरोपी अशा प्रकारे कृत्य करुन परिसरात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share to