कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या मोटारीला अपघात

पुणे (प्रतिनिधी) – कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कारचा अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथे त्यांच्या कारला अपघात झाला असून यात त्यांचा चालक जखमी झाल्याची माहिती समजते. बुधवारी (दि. 13) रात्री साडेआठच्या सुमारास ही घडना घडली आहे.

या अपघातात कारचा चालक संजय गायकवाड हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने इंदोरीकर महाराजांना कुठलीही इजा झाली नाही. त्यामुळे अपघात झाल्यानंतर ते दुस-या वाहनाने नियोजित कीर्तनाच्या ठिकाणी गेले आणि आपली कीर्तनसेवा सादर केली.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरीकर महाराज बुधवारी रात्री खांडवीवाडी येथे कीर्तनासाठी जात होते. परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर एका लाकडाची वाहतूक करणा-या ट्रकला त्यांच्या स्कोर्पिओ (एम एच 12 / टी वाय 1744) कारचा अपघात झाला. ट्रक रस्ता ओलांडत असताना इंदोरीकर महाराज यांच्या कारची ट्रकला धडक बसली. या अपघातात कारचे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच परतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर इंदोरीकर महाराज यांना नियोजित ठिकाणी कीर्तनासाठी दुस-या वाहनाने पोहोचवण्यात आले. तर जखमी चालकाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी देखील अपघातस्थळी मोठी गर्दी केली.

Share to