भोंगे हटवण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे, जातीय तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटविण्याचा इशारा दिल्यानंतर मुंबई पोलिसांकडून ध्वनीक्षेपक वापरण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे तयार केली जात आहेत. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त लाऊडस्पीकरच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्वे तयार करतील. येत्या काही दिवसवांतच ही तत्वे जारी केली जातील, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी सांगितले.

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबईचे आयुक्त संजय पांडे एकत्र बसून राज्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करतील. एक-दोन दिवसांत ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. सर्वांना त्यांची अंमलबजावणी करावी लागेल, असे गृहमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्यास सांगितले आहे. मशिदींवर भोंग्यांच्या मोठ्या आवाजामुळे इतर समुदायातील सदस्यांना मुस्लिमांच्या नमाज ऐकण्याची सक्ती केली जाते ती योग्य नाही. याचा नागरीकांना वर्षभर रोज त्रास सहन करावा लागतो. लाऊडस्पीकर न लावता मुस्लिमांनी नमाज पढण्यास आमची काहीही हरकत नाही अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.

3 मे पर्यंत मशिदींवरील हे लाऊडस्पीकर्स हटवले नाहीत तर मशिदीबाहेर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवण्याची धमकी त्यांनी दिली आहे. भाजपने राज ठाकरेंच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.राज्यात जातीय तेढ निर्माण करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेने केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री वळसेपाटील यांनी दिला आहे.

Share to