पालघर जिल्ह्यात दोन एसटी बसचा भीषण अपघात, 50 प्रवासी जखमी
पुणे – पालघर जिल्ह्यातील विक्रमगड वाडा रस्त्याला महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसचा विचित्र अपघात झाला आहे. आज शुक्रवारी (दि. १० सप्टेंबर) सकाळी साडे नऊच्या सुमारास विक्रमगढ तालुक्यातील आलोंढे गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात पालघरमधील दोन्ही बसमधील मिळून जवळपास ५० प्रवासी जखमी झाले आहेत. तर, सध्या या जखमींना उपचारासाठी विक्रमगड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. दिलासादायक बाब हीच कि, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डहाणू ते ठाणे आणि वाडा ते जव्हार बस या दोन्ही बस समोरासमोर येऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला. विक्रमगडवरून वाडाकडे जाणारी डहाणू-ठाणे-सातारा बस आणि वाड्यावरून येणारी वाडा-जव्हार बस या कोकणी पाडा येथील राईसमिलजवळ एकमेकांना धडकल्या. या अपघाताची भीषणता इतकी होती की, बस अक्षरश: कागद फाडावा तशी चिरत गेली आहे. ५० जखमींपैकी काहींना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता आहे.