कोरोनामुळे दगडूशेठ हलवाई गणपतीची मुख्य मंदिरातच प्राणप्रतिष्ठा

पुणे – मोजक्या लोकांच्या उपस्थितीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठा ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 129 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

आज सकाळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण आदी उपस्थित होते. वेदमूर्ती मिलींद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.

ऑनलाईन अथर्वशीर्ष पठण

यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य नसल्याने ट्रस्टने ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ऋषीपंचमीनिमित्त शनिवार, दिनांक 11 सप्टेंबर रोजी पहाटे 6 वाजता अथर्वशीर्ष पठण सोहळा ऑनलाईन पद्धतीने होईल. ट्रस्टच्या फेसबुक पेज, इन्स्टाग्राम याद्वारे या उपक्रमाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे.

श्रींचे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

Share to