मोशीत भरणार पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन
पिंपरी (प्रतिनिधी) – किसान कृषी प्रदर्शन 23 ते 27 मार्च 2022 दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, भोसरीजवळ, पुणे येथे भरणार आहे. 15 एकर प्रदर्शन क्षेत्रावर 300 हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करणार आहेत. प्रदर्शनात पाच दिवसांमध्ये देशभरातून सुमारे एक लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.
आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. किसान प्रदर्शनाला कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य व इतर शेती क्षेत्रातील मान्यवर संस्थांचा सहभाग व सहकार्य लाभले आहे.
यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या 80 हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असेल. भारतीय कृषी अनुसंधान परिषद व त्यांच्या संशोधन संस्थाचाही कृषी प्रदर्शनात सहभाग असणार आहे.
मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकऱ्यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकऱ्यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधींची माहिती घेऊ शकतील.