‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत शहरातील चौक सुशोभीकरणाचे काम सलग ७५ तास सुरु

 पिंपरी (प्रतिनिधी) – देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पुर्ण झाल्यामुळे संपुर्ण भारतामध्ये २०२२ या वर्षात “आझादी का अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखिल स्मार्ट सिटीच्या माध्यमातुन  “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करण्यासाठी नागरिकांनी उपयुक्त होईल व त्यामध्ये नागरिक सहभागी होतील असा उपक्रम राबवित आहे.

या महोत्सवामध्ये शहरातील नागरिकांना सामावुन घेतल्यामुळे देशाप्रती देशप्रेम, भारतमाते विषयी आदर या शिवाय मी या शहराचा नागरिक म्हणून माझी जबाबदारी काय ? याची जाण या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये निर्माण होण्यास मदत होणार आहे. या अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुदर्शननगर चौक, सांगवी या ठिकाणी सब-वे च्या वर सुमारे ३५००० चौ. फुटात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत सलग ७५ तास काम सुरु ठेवुन ते पुर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये ८ ते ८० वयोगटातील नागरिकांना उपयुक्त होईल अशी व्यवस्था केल्यामुळे याला “ ८ ते ८० प्लाझा” असे नाव देण्यात आले आहे.

या ठिकाणी लहान मुलांना खेळण्या बागडण्यासाठी स्केटींग रींग, स्केटर्स, जॉगींग ट्रॅक, वृध्दांना वाचन करणे, गप्पाटप्पांना बसावयाची व्यवस्था, व्यायामासाठी जागेची व्यवस्था, ओपन जीम इक्वीपमेंट, भावगीते-भक्तीगीते ऐकण्यासाठी म्युझीक सिस्टीम बसविण्यात येणार आहे. हे काम दि. २३ जानेवारी २२ पासून सुरु करण्यात आले असुन ते सलगपणे पुर्ण करुन दि. २६ जानेवारी २०२२ या प्रजासत्ताक दिनी उद्घाटन करुन लोकार्पण करण्यात येणार आहे.    

अशा प्रकारे शहरातील आठही प्रभागातील विविध इतर ८ ठिकाणच्या मोठ्या चौकांचा “आझादी का अमृत महोत्सव” उपक्रमात अंतर्भाव करण्यात आलेला असुन या अंतर्गत या ठिकाणीही सलग ७५ तासांमध्ये काम सुरु ठेवून चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या चौकांमध्ये सुशोभीकरणाअंतर्गत नागरिकांना उपयुक्त होतील अशा प्रकारे नियोजन करण्यात येणार असुन याचेदेखील सलग ७५ तास काम सुरु ठेवून ते दि. २६ जानेवारी २०२२ या प्रजासत्ताक दिनी या चौकांचे उद्घाटन करुन लोकार्पण करण्यात येणार आहे.

Share to