प्लास्टिक मुक्त शहर मोहीम सर्वांनी निरंतर चालवावी – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी (प्रतिनिधी) – मानवी  कल्याण आणि वसुंधरेच्या शाश्वत अस्तित्वासाठी सर्वांनी  प्लास्टिक मुक्त शहर मोहिमेत सहभागी होऊन ही मोहीम निरंतर चालवावी असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात २५ मे ते ५ जून २०२२ या कालावधी दरम्यान “प्लास्टिक मुक्त शहर विशेष मोहीम” राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या दुस-या दिवशी सकाळी आयुक्त पाटील यांच्या उपस्थितीत  लिंकरोड चिंचवड येथील यशोपुरम सोसायटी परिसरातील मोकळ्या जागेत प्लॉगेथॉन मोहीम पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी महादेव शिंदे, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह संस्कार प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचे स्वयंसेवक, नागरिक आदी सहभागी होते.

आयुक्त पाटील म्हणाले पुनर्वापरात न येणारे प्लास्टिक वापरणे टाळले पाहिजे. प्लास्टिक चे विघटन होण्यासाठी शेकडो वर्ष लागतात. तसेच प्लास्टिकचे नद्या आणि समुद्रांमध्ये वहन व संचयन होत असते. त्यामुळे समुद्र आणि नद्यांमध्ये जलचर जीवांपेक्षा प्लास्टिकचे प्रमाण अधिक वाढत आहे. परिणामी प्लास्टिकमुळे नद्या आणि समुद्रातील जैवविविधता आणि परिसंस्था धोक्यात येत आहेत. तसेच प्लास्टिक मधील घातक रसायने मातीमध्ये मिसळून मातीची कस आणि उत्पादकता कमी होत आहे. या सर्व बाबी मानवी जीवनावर आणि पर्यावरणावर घातक परिणाम करणाऱ्या आहेत. याबाबी लक्षात घेत नागरिकांनी वेळीच आपली जबाबदारी ओळखून एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या वापरास नकार दिला पाहिजे. आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा आणि संसाधनांचा वापर केला पाहिजे,  असे ते म्हणाले.  

दरम्यान, आयुक्त पाटील यांच्या उपस्थितीत नद्या, नाले, निसर्ग प्लास्टिकमुक्त करण्याची  आणि शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी आयुक्त यांच्या सोबत महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध संस्थांच्या स्वयंसेवकांनी प्लास्टिक गोळा केला. तसेच आज अ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बिजलीनगर ग्रेडसेपरेटर्स गंगानगर मार्ग ते दळवी नगर उड्डाणपूल परिसरात  प्लॉगेथॉन मोहीम पार पडली. यावेळी आयुक्त पाटील यांच्यासह, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी कुंडलिक दरोडे, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग चे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, बेसिक्स संस्थेचे स्वयंसेवक, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, नागरिक आदी सहभागी होते.

तत्पूर्वी “बेसिक्स” या संस्थेच्या स्वयंसेवकांनी प्लास्टिक मुक्ती आणि स्वच्छते विषयी “पथनाट्य” सादर केले. त्याचबरोबर  उपस्थितांनी शहर प्लास्टिक मुक्त करण्याची शपथ घेतली. यानंतर  महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सकाळी १०.३० वाजता “प्लास्टिक मुक्त शहर जनजागृती पदयात्रा” काढण्यात आली. सबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिका-यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या पदयात्रेत क्षेत्रीय कार्यालयातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विविध  अशासकीय संस्थाचे स्वयंसेवक, सामाजिक संघटनांचे  सदस्य,  विद्यार्थी, नागरिक  आदी उपस्थित होते.  

शहरात प्लास्टिक मुक्त शहर मोहिमेंतर्गत  दि. २७, २८, २९ मे २०२२ रोजी अनुक्रमे  क आणि ड, ई आणि फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटना, नागरिक यांच्या सहभागातून प्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच ४ जून २०२२ रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत “रिव्हर प्लॉगेथॉन” मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये पवना नदीमध्ये सांगवडे (किवळे) ते संगम येथे, मुळा नदीमध्ये वाकड ते संगम येथे, इंद्रायणी नदीमध्ये तळवडे ते चऱ्होली येथे “रिव्हर प्लॉगेथॉन” मोहिम पार पडणार आहे.

शासनाने बंदी घातलेल्या तसेच एकवेळ वापरासाठी असलेल्या प्लास्टिक पिशवी बंदीबाबत शहरात विविध माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. कापडी पिशवीचा वापर करत असल्याचा सेल्फी काढण्याचा उपक्रम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. शहरात राबविण्यात येणाऱ्या प्लास्टिक मुक्ती मोहिमेत शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, बचत गट, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, अशासकीय संस्था, गणेश मंडळे, क्लब, इतर संघटना, महापालिका अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले आहे.

Share to