शाळेतील विद्यार्थ्यांनाही मिळणार स्वच्छतेचे धडे, पालिका झिरो वेस्ट मोहीम राबविणार

पिंपरी (प्रतिनिधी) – आता शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे मिळणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ शाळांमध्ये झिरो वेस्ट (शून्य कचरा) मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागण्यास मदत होणार आहे.

महापालिकेच्या आठ शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर झिरो वेस्ट ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत कचरा तयार होणार नाही याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

शाळा स्तरावर सुका कचरा व भंगार व्यवस्थापन समिती, रोपे – वृक्षारोपण कुंड्या सजावट व संगोपन समिती, दैनंदिन शाळा स्वच्छता व सजावट समिती, शून्य कचरा प्रबोधन व संस्कार वर्ग समिती, स्वच्छ पाणी-किचन भांडी-स्वच्छतागृह समिती, ओला कचरा कंपोस्टींग– हिरवा चारा व्यवस्थापन समिती, प्लॅस्टिक पेपर व्यवस्थापन समिती अशा पद्धतीने समित्या तयार करून विद्यार्थ्यांना स्वच्छतेवर काम करण्यास प्रवृत्त केले जाणार आहे. तसेच ओला, सुका, घातक, जैववैद्यकीय अशा कचऱ्यांचे वर्गीकरण करुन त्याची योग्य व्यवस्था लावण्याचे प्रशिक्षण देखील मुलांना दिले जाणार आहे.

त्यासाठी मेसर्स आसरा सोशल फाउंडेशन या संस्थेची प्रायोगिक तत्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेला दरमहा प्रतिशाळा 5 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. सहा महिन्यांसाठी एकूण 2 लाख 40 हजार रुपये मोबदला या संस्थेला दिला जाणार आहे. त्याला महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे.

Share to