तारा ‘एअरलाइन्स’चे विमान नेपाळमध्ये कोसळले, सर्वच प्रवाशांचा मृत्यू !

नवी दिल्ली – नेपाळमध्ये रविवारी कोसळलेल्या तारा एअरलाइन्सच्या विमानाचे अवशेष सापडल्यानंतर आता या विमानातून प्रवास करत असणाऱ्या सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण या दुर्घटनेनंतर आतापर्यंत १४ प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत. अजूनही बाकीच्या प्रवाशांचा शोध घेतला जात असून नेपाळच्या गृहमंत्रालयाने सर्व २२ प्रवाशांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली आहे.

नेपाळमध्ये तारा एअरलाइनची फ्लाईट ९ एनएईटी पोखरा येथून जोमसोमला जात होती. रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हे विमान अचानक बेपत्ता झाले होते. या घटनेनंतर बचाव पथकाला या विमानाचे अवशेष सापडले होते. आता या विमानातील १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत.

“या विमानात प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याचा आम्हाला संशय आहे. आमच्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत सर्वांचाच मृत्यू झाला असावा, मात्र अजूनही अधिकृत माहिती येण्याची आम्ही वाट पाहत आहोत,” असे नेपाळ गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

नेपाळमधील या विमान दुर्घटनेत चार भारतीयांचा समावेश आहे. हे भारतीय मूळचे ठाण्याचे असून यामध्ये अशोक कुमार त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर हे विभक्त दाम्पत्य तसेच धनुष आणि रितिका या त्यांच्या मुलांचा समावेश आहे. अशोक कुमार आणि वैभवी हे विभक्त दाम्पत्य आपल्या मुलांना वर्षातून एकदा परदेश पर्यटनासाठी घेऊन जात असे. यंदा ते मुलांना घेऊन नेपाळला गेले होते. सध्या त्यांचादेखील शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Share to