केंद्राच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील ‘या’ पाच जिल्ह्यांनी मारली बाजी
मुंबई – केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत(2020-21)’ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाच जिल्ह्यांनी बाजी मारली. सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम आणि सोलापूर या विजयी जिल्ह्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज येथे गौरविण्यात आले.
येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या नालंदा सभागृहात केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. यावेळी मंत्रालयाच्या सहसचिव अनुराधा वेमुरी आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे मुख्य नियंत्रण अधिकारी वेदमनी तिवारी उपस्थित होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील 467 जिल्ह्यांतून विजयी ठरलेल्या 30 जिल्ह्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये गौरविण्यात आले.
देशभरातून एकूण 8 जिल्ह्यांना “उत्कृष्टता पुरस्कार’ श्रेणीत गौरविण्यात आले. यात सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
शेखर सिंह म्हणाले, उत्कृष्टता पुरस्कार श्रेणीत निवड झालेल्या देशातील 8 जिल्ह्यांमध्ये सातारा पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये आहे. या पुरस्कारात मार्गदर्शन केंद्राच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. कोविडच्या काळात जवळपास एक हजार कोविड फ्रंटलाईन कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. साहसी खेळ, ग्रामीण व कृषी पर्यटनासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली.
देशभरातून एकूण 13 जिल्ह्यांना “उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार’ श्रेणीत गौरविण्यात आले. यात ठाणे आणि वाशिम जिल्ह्यांचा समावेश आहे. हा पुरस्कार सहायक आयुक्त कविता जावळे आणि सुनंदा बजाज यांनी स्वीकारला.
देशातील एकूण 9 जिल्ह्यांना या स्पर्धेंतर्गत “प्रशस्तीपत्र पुरस्कार’ श्रेणीत गौरविण्यात आले. या श्रेणीत सोलापूर जिल्ह्याला सन्मानित करण्यात आले. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.