पिंपळे सौदागरमध्ये रविवारी पालकत्व शिबिराचे आयोजन

  • प्रभावी पालकत्व शैलीच्या गुणवैशिष्टयांची मानसोपचार तज्ञ देणार माहिती
  • सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई संदीप काटे यांचा उपक्रम

पिंपरी (प्रतिनिधी) :- सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई काटे, निलेश काटे युवा मंच आणि उद्योजक संदीप काटे यांच्या वतीने पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या आवारात रविवारी (दि. ५) रोजी सायंकाळी ५.३० वा. विशेष पालकत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.

याबाबत माहिती देताना सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई काटे म्हणाल्या, पालकत्व ही मुळातच एक मोठी जबाबदारी असते. ही जबाबदारी घेत असताना आई-वडील म्हणून त्यांना काही नियम लागू असतात. दोन भिन्न व्यक्तिमत्वांचे संस्कार मुलांवर करीत असताना मुलांशी सुसंवाद राखण्यासाठी काही गोष्टीची काळजी घेणे महत्वाचे असते. त्यांना प्रभावी पालकत्व शैलीचे गुणवैशिष्टे माहित असणे आवश्यक असते. पालकांना ही गुणवैशिष्टे माहित असावीत यासाठी पालकत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात पालकांना सकारात्मक पालकत्व आणि शिस्तबद्धता, कौटुंबिक संवाद, कौटुंबिक नियम आणि दिनचर्या, मुलांशी वागणूक, स्वभाव आणि भावना अशा बऱ्याच बाबींवर मानसोपचार तज्ञ सखोल माहिती देणार आहेत. परिसरातील सोसायटी वर्ग आणि पालकांनी आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन अनिताताई काटे यांनी केले आहे.

Share to