एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून मोठी कारवाई

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. आज १२ आमदारांना घेऊन शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. सोमवारी रात्रीपासून एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह सूरतमध्ये दाखल झाले आहेत. 

शिवसेनेविरोधात बंड करुन सुरतमध्ये गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेने आता कारवाई करत त्यांना गटनेते पदावरुन हटवले आहे. त्या ठिकाणी आता शिवडी मतदारसंघाच्या अजय चौधरी यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर तडकाफडकी कारवाई करत हा निर्णय घेतला आहे. 

अजय चौधरी हे शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. २०१९ मध्ये विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी ४० हजार मताधिक्क्याने विजयी झाले होते. त्यांनी मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दारुण पराभव केला होता. चौधरी हे परळ येथे वास्तव्यास आहेत. 

Share to