एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ
मुंबई – महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज (गुरुवारी) शपथ घेतली. शिंदे यांनी सेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे या मागणीसह बंड पुकारले होते. त्यांच्या या बंडाला ३९ सेना आमदारांनी पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना त्यांचे बंड मोडून काढण्यात सपशेल अपयश आल्याने अखेर बुधवारी रात्री ९.३० वाजता त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
शिंदे भाजपसोबत सत्ता स्थापन करतील हे स्पष्ट होते. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी शिंदे हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असल्याची घोषणा करत एकच खळबळ उडवून दिली. अनपेक्षितरित्या मुख्यमंत्रीपदाची माळ शिंदे यांच्या गळ्यात पडली आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या नावाचे स्मरण केले. शिंदे हे महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री ठरले.
दरम्यान, शिंदे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपण या मंत्रिमंडळात कोणतेही पद स्वीकारणार नाही असे फडणवीस यांनी याआधी सांगितले होते. मात्र केंद्रीय नेतृत्वाने आग्रह केल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला.