उत्तम आरोग्यासाठी योगासन महत्त्वाचे – अतिष बारणे
- मोशीत सक्षम सोशल फाउंडेशन व अतिश बारणे युवा मंचतर्फे योग शिबिराचे आयोजन
पिंपरी (प्रतिनिधी) – सध्याचे आयुष्य धकाधकीचे झाले आहे. नोकरीच्या व्यापात प्रत्येक जण धावपळ करत आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगासने महत्वाचे आहेत. योगासनांमुळे शरीराबरोबरच मनस्वास्थ देखील चांगले राहते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी व्यक्त केले.
मोशी येथील आतिष आनंदाराव बारणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. या निमित्त सक्षम सोशल फाउंडेशन व अतिश आनंदाराव बारणे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी योग शिक्षिका श्रद्धा पाटील यांनी प्राणायम व आहार या बाबत मार्गदर्शन केले. या शिबिरात सुमारे 100 नागरिकांनी सहभाग घेतला. या वेळी सक्षम सोशल फाउंडेशन व अतिश आनंदाराव बारणे युवा मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अतिश बारणे म्हणाले, की बदलत्या जीवनशैलीमुळे ताण- ताणाव वाढत आहे. यामुळे आरोग्याच्या तक्रारीही वाढत आहेत. तरुणांमध्येही व्याधींचे प्रमाण वाढले आहे. शरीर रोगमुक्त ठेवण्याचा धडा आपल्याला कोरोनाने शिकविला आहे. त्यामुळे यापुढील काळात व्यसनापासून दूर राहण्याबरोबरच संतुलीत आहार आणि व्यायाम या त्रिसुत्रीचे पालन करावे लागणार आहे. योग दिनानिमित्त दररोज योगासने करुन शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्याचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे.
दरवर्षी योगशिबीराचे आयोजन –
योगासने करण्याचे महत्त्व वाढत आहे. अनेक तज्ञ त्याबाबत महत्त्व पटवून देत आहेत. नागरिकांचे आरोग्य नीट राहावे यासाठी दरवर्षी योग तज्ञ बोलावून योगशिबिराचे आयोजन करणार असल्याचे आतिष बारणे म्हणाले.