आगामी महापालिका निवडणुकीत 15 लाख 693 मतदार बजावणार हक्क, यंदा तीन लाख नवीन मतदारांची वाढ

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते. त्यानुषंगाने महापालिकेने पिंपरी-चिंचवड शहरातील मतदारांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार शहरात एकूण 15 लाख 693 मतदार आहेत. त्यातील 12 हजार 564 मतदार वगळण्यात आले आहेत. एवढे सोडले तर एकूण 14 लाख 88 हजार 129 मदारांना महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.

मतदार यादीमध्ये 31 मे 2022 अखेरपर्यंत विधानसभा मतदारयादीमध्ये नोंदीत मतदारांची नावे घेतली आहेत. त्यानुसार मतदारांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 5 लाख 86 हजार 849 मतदार आहेत. तर, भोसरी विधानसभा मतदारसंघात 5 लाख 27 हजार 799 एवढे मतदार आहेत. पिंपरी विधानसभा मतदार संघात 3 लाख 76 हजार 470 आणि भोर विधानसभा मतदारसंघातील ताथवडेगावात 9 हजार 575 मतदार आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 15 लाख 693 मतदार आहेत. त्यापैकी 12 हजार 564 वगळण्यात आले आहेत. त्यातील मतदारांनी स्थालांतर केले अथवा मयत झाले अशी माहिती आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीला 14 लाख 88 हजार 129 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यात पुरुष मतदारांची संख्या 8 लाख 394 आहे, तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 87 हजार 647 एवढी आहे. इतर 88 मतदार आहेत. दरम्यान, 2017 च्या निवडणुकीपेक्षा यंदा मतदारांमध्ये वाढ झाली असून वाढलेल्या नवीन मतदारांची संख्या 3 लाख आहे.

अशी माहिती आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब खांडेकर, उपजिल्हाधिकारी प्रशांत जोशी, उपायुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Share to