पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ चिंचवडगावात शिवसैनिक रस्त्यावर

  • उद्धव साहेबांच्या समर्थनार्थ सामुहिक प्रतिज्ञा तर, बंडखोरांच्या निषेधार्थ घोषणा

पिंपरी :- ”आम्ही कट्टर शिवसैनिक असून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे पाईक आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहू”, असा निर्धार चिंचवडगावातील वेताळनगर शिवसेना शाखेच्या शिवसैनिकांनी केला.

शिवसेनेचे चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर व चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. २५) रोजी सायंकाळी पाच वाजता शेकडो शिवसैनिक एकत्र आले. महाराष्ट्र राज्याचे यशस्वी, संयमी मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना पाठिंबा देत, त्यांच्या समर्थनात शिवसैनिकांनी सामुहिक प्रतिज्ञा घेतली. तसेच शिवसेनेशी गद्दारी करून बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

यावेळी चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर, बाळासाहेब भोंडवे, अमोल निकम, राजेश अरसूळ, संदीप भालके, माउली जगताप, महेश कलाल, दीपक भोंडवे, राजेंद्र तरस, गोरख पाटील, प्रदीप दळवी, संतोष शिंदे, कुदरत खान, मजीद शेख, किशोर सातपुते, राजू मासळकर, अविनाश आरसूळ, रफिक बेग, रमेश शेंडगे, सुनील बोऱ्हाडे, पांडुरंग अडागळे, दत्ता अडगळे, अनिल उफांडे, जग्गनाथ कराडकर, महेशशेठ, संदीप, अस्लम शेख, खय्युम पठाण, पदाधिकारी, शिवसैनिक आणि वेताळनगर रिक्षास्टेन्डचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शहर संघटक संतोष सौंदणकर म्हणाले, ”शिवसैनिकांमध्ये प्राण आहे, तोपर्यंत आम्ही उद्धव साहेबांसोबत सोबत आहेत. ज्यांनी बंड केले आहे, त्यांना निवडून देणारा शिवसैनिक मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत असल्याने ‘फिनिक्स’प्रमाणे शिवसेना पुन्हा भरारी घेईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो आदेश देतील आणि जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य आहे”.

विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे म्हणाले, “छत्रपती शिवरायांचा जो भगवा बाळासाहेबांनी आपल्या खांद्यावर दिलाय, तो आबाद ठेवण्याचे काम सर्वांनी करावं. हीच कळकळीची विनंती. फक्त एकच काम करा, छत्रपतींच्या भगव्याला डाग लावू देऊ नका. ज्यांनी-ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली, त्यांच्यावर पुन्हा गुलाल उधळला नाही. म्हणून सर्व आमदारांनी उद्धव साहेबांकडे परत यावे. साहेब शंभर टक्के तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाहीत.”

उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर म्हणाले, ”उद्धवसाहेब तुम्ही लढत रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमदार गेले ते कट्टर शिवसैनिक असतील तर परत येतील. पक्षांतर्गत मतभेद आम्ही लवकरच सोडवू आणि पुन्हा शिवसेना खंबीरपणे एकजुटीने उभी राहील”.

याप्रसंगी कार्यकर्त्यांनी ”आम्ही उद्धव साहेब यांच्या पाठीशी कायम राहू” अशी शपथ घेत ”उद्धवसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा दिल्या.

Share to