शहरात आज दोन ठिकाणी झाड कोसळले, एका ठिकाणी कारचे नुकसान
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे पिंपळे सौदागर येथे एक मोठे झाड कारवर कोसळले. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. कारचे नुकसान झाले आहे. दरम्यान, थेरगावमधील डांगेचौक परिसरातही रस्त्यावर एक झाड कोसळले.
प्रभाग २८ रहाटणी-पिंपळे सौदागर येथील फाईव्ह गार्डन सोसायटीमध्ये पावसामुळे झाड पडल्याची घटना घडली. यात कोणतीही हाणी झाली नसून हे झाड सोसायटीतील सभासदाच्या चारचाकी गाडीवर कोसळले. यात गाडीचे नुकसान झाले आहे. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या उद्यान विभागाला संपर्क साधून झाड त्वरित हटविण्याच्या सूचना केल्या. यावेळी नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या टीमने घटनास्थळी जाऊन झाड हटविण्यास मदत केली.
थेरगाव येथील डांगे चौकजवळील भोईर एस्टेट या सोसायटीच्या मुख्य रस्त्यावरिल गुलमोहराचे झाड पावसामुळे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळले. या घटनेत देखील सुदैवाने कोणतीही हाणी झाली नाही. मात्र, झाड रस्त्यात कोसळल्याने सोसायटीचा रस्ता बंद झाला होता.
घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक अभिषेक बारणे यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाशी संपर्क साधला. तसेच, तातडीने हे झाड हटविण्याची सूचना केली. त्यानंतर महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने हे झाड बाजूला घेऊन नागरिकांसाठी रस्ता मोकळा केला.